२ एप्रिल २०११ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे मैदानात अंतिम सामन्यात श्रीलंकेवर मात करत विजेतेपद पटकावलं. आजही अनेक भारतीय चाहत्यांसाठी या दिवसाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम आहेत. भारतीय चाहत्यांसाठी ही स्पर्धा आणखी एका कारणासाठी महत्वाची होती. सचिन तेंडुलकरची ती अखेरची विश्वचषक स्पर्धा होती. विजेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहलीने सचिनला आपल्या खांद्यावर बसवत संपूर्ण मैदानात फेरी मारली होती. या घटनेनंतर अनेक वर्षांनी विराटने यामागचं रहस्य उलगडलं आहे.

अवश्य वाचा – सुरेश रैना म्हणतो…विराट नाही, ‘हा’ खेळाडू आहे भारताचा दुसरा धोनी !

“विश्वचषक जिंकल्यामुळे त्यावेळी मी खूप आनंदात होतो. त्याक्षणी प्रत्येकाचं लक्ष्य हे सचिनकडे होतं. सचिनचा हा अखेरचा विश्वचषक आहे हे आम्हा सर्वांना माहिती होतं. आतापर्यंत सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेटला दिलेलं योगदान हे खूप मोठं आहे. त्याच्या अनेक खेळींमुळे भारतीय संघाने कठीण सामन्यांतही विजय मिळवला आहे. त्याचा खेळ पाहून अनेक खेळाडू क्रिकेटकडे वळले. भारतासाठी विश्वचषक जिंकणं हे सचिनचंही स्वप्न होतं. इतकी वर्ष भारतीय संघासाठी खेळल्यानंतर अखेरच्या विश्वचषक स्पर्धेत विजयी झाल्यानंतर त्याला सन्मान होणं मला गरजेचं वाटलं. त्यामुळे मी कोणताही विचार न करता पुढे येऊन त्याला खांद्यावर उचलून घेतलं.” विराट कोहली मयांक अग्रवालच्या Open Nets with Mayank या कार्यक्रमात बोलत होता.

यानंतर धोनीने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि भारतीय संघाचं नेतृत्व हे विराट कोहलीकडे आलं. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आश्वासक कामगिरी केलेली असली तरीही एकाही महत्वाच्या आयसीसी स्पर्धेत त्याला भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देता आलेलं नाही. २०१९ विश्वचषक स्पर्धेतही उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आगामी काळात विराट भारताला आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवून देतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – ICC ODI Ranking : विराट-रोहित अव्वल स्थानावर कायम