टीम इंडियाचे शास्त्री गुरुजी म्हणजेच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बुधवारी आपला ५८ वा वाढदिवस साजरा केला. करोना व्हायरसच्या तडाख्यामुळे सध्या रवी शास्त्री हे घरातच आहेत. देशभरात लॉकडाउन असल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत वाढदिवस साजरा करणे त्यांना शक्य झाले नाही. तसेच आपल्या लाडक्या शास्त्री गुरुंजीना भेटून शुभेच्छा देणेदेखील भारतीय खेळाडूंना शक्य झाले नाही. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीसह इतर खेळाडूंनी शास्त्रींना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

रवी शास्त्री यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना ८० कसोटी आणि १५० वन डे सामने खेळले. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ६,९३८ धावा केल्या आणि २८० बळी टिपले.

दरम्यान, करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण असताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी करोनाविरोधातील विश्वचषक आपण जिंकायचाच असा निर्धार व्यक्त केला होता. “खेळ तुम्हाला जीवनातील असे काही धडे देतो, ज्याचा तुम्हाला कुठेही वापर करता येतो. सध्या आपण सारे करोनाच्या तडाख्यात आहोत. करोनाशी संघर्ष करणे म्हणजे विश्वचषकासाठी स्पर्धा करण्यासारखेच आहे. करोना हा साऱ्या विश्वचषकांचा बाप आहे. हा विश्वचषक जिंकण्यासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावायला हवं. या विश्वचषकासाठी आपण फक्त ११ नव्हे तर १.४ बिलियन लोकांनी एकत्र प्रयत्न करूया आणि करोनाला पळवून लावूया, असा संदेश त्यांनी व्हिडीओतून दिला होता.