भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील संघाला इंग्लंडकडून पहिल्या कसोटीत हार पत्करावी लागली. या सामन्याच्या चौथ्या डावात भारताला माफक १९४ धावांचे आव्हान होते आणि भारताकडे २ दिवसांहून अधिकच कालावधी होता. पण भारताच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. दोनही डावात फक्त कर्णधार विराट कोहली याने झुंजार वृत्ती दाखवत अनुक्रमे १४९ आणि ५१ धावा केल्या. त्याच्या या झुंजार खेळीचे कौतुक झाले. याशिवाय, आणखी एका गोष्टीमुळे सध्या विराट कोहलीचे कौतुक होत आहे. कोहलीच्या एका ‘विराट’ कारनाम्यामुळे त्याला सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, सर व्हिव्हियन रिचर्ड्स यासारख्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

‘आयसीसी’ची एकदिवसीय आणि कसोटी क्रमवारी नुकतीच जाहीर झाली. या यादीत दोनही प्रकारांमध्ये कर्णधार विराट कोहली हा फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. असा कारनामा करणारा कोहली हा जगातील नववा खेळाडू ठरला आहे. तर दुसरा भारतीय ठरला आहे. या आधी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ही किमया केली होती. त्याने १९९८ आणि २००१-०२ या वेळी एकदिवसीय आणि कसोटी क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थान पटकावले होते.

याशिवाय, जगातील एकूण आठ खेळाडूंनी कोहलीच्या आधी या पराक्रमाला गवसणी घातली होती. या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे केथ स्टॅकपोल (१९७२), विंडीजने सर व्हिव्हियन रिचर्ड्स (१९८२, १९८५-८८), पाकिस्तानचा जावेद मियांदाद (१९८९), विंडीजचा ब्रायन लारा (१९९४-९६), द. आफ्रिकेचा जॅक कॅलिस (२००५), ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग (२००५-०७) आणि द. आफ्रिकेचा हाशिम आमला (२०१३) यांचा समावेश आहे.