विराट कोहलीने चौथ्या एकदिवसीय सामन्यात नेत्रदीपक शतक झळकावले आणि त्या जोरावर भारताला सामना जिंकत मालिकेत २-२ अशी बरोबरी साधता आली. भेदक गोलंदाजीचा सामना करताना साकारलेली शतकी खेळी माझ्यासाठी आव्हानात्मक होती, असे मत कोहलीने व्यक्त केले आहे.

‘‘दक्षिण आफ्रिकेचा अचूक मारा पाहता त्यांच्याविरुद्ध झळकावलेले हे शतक माझ्यासाठी आव्हानात्मक होते. या खेळपट्टीवर चेंडू थोडा संथपणे येत असल्याने फलंदाजी करणे सोपे नव्हते. त्यामुळेच मी एकेरी-दुहेरी धावांवर अधिक भर दिला. दोन क्षेत्ररक्षकांमधून कसे फटके खेळता येतील, याचा अधिक विचार केला,’’ असे कोहली म्हणाला.

तो पुढे म्हणाला की, ‘‘चेन्नईमध्ये फलंदाजी करणे सोपे नसते. शरीराची तुम्हाला या वेळी साथ लाभेलच असे सांगता येत नाही. धावसंख्येची सत्तरी गाठेपर्यंत मी फक्त तीनच चौकार लगावले होते. खेळपट्टीवर तासभर उभे राहिल्यावर मला मैदानात पूर्णपणे धावता येत नव्हते, पण मालिकेत बरोबरी करू शकल्यामुळे ही खेळी अतिशय आनंददायी ठरली. जेव्हा तुम्ही १-२ असे मालिकेत पिछाडीवर असता आणि त्यानंतरच्या सामन्यात तुम्ही शतक झळकावता, संघ विजयी ठरतो, हा आनंद वेगळाच असतो.’’

फिरकीपटूंनी सामना हिरावला – डोमिंगो
चेन्नई : विराट कोहलीने दमदार शतक झळकावले. त्याने अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैना यांच्याबरोबर चांगली भागीदारीही रचली. त्याचबरोबर भारताच्या फिरकीपटूंनी नेत्रदीपक कामगिरी करत आमच्याकडून सामना हिरावला, असे मत दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी सांगतिले.

डू प्लेसिसला दंड
दुबई : चेन्नईत भारताविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात पंचांच्या निर्णयाबाबत नाराजी प्रकट करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या फॅफ डू प्लेसिसच्या सामन्याच्या मानधनाची १५ टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीच्या १५व्या षटकात ही घटना घडली. प्लेसिस अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देऊन बाद झाला. मात्र या निर्णयाबाबत असमाधानी प्लेसिसने उजवा हात वर करून नापसंती दर्शवली. आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्याकडील सुनावणीप्रसंगी प्लेसिसने आपली चूक कबूल केली.