भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांबद्दल बोलायचे झाले, तर दोघांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे आहेत. धोनी कर्णधार म्हणून मैदानावर असताना शांत आणि संयमी असायचा, तर विराटची ओळख अतिशय आक्रमक कर्णधार अशी आहे. दोघांनी भारतीय संघाला अनेक मालिकांमध्ये विजय मिळवून दिले. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर संघाचे नेतृत्व करण्याची संधी विराटला मिळण्यासाठी धोनीनेच मदत केली, असे स्वत: विराटने सांगितले. फिरकीपटू अश्विनसोबत इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे विराटने संवाद साधला. त्यावेळी तो बोलत होता.

“जेव्हा मी भारतीय संघात आलो, तेव्हापासून मला शिकण्याची खूप इच्छा आणि उत्सुकता होती. मैदानावर मी नेहमी धोनीच्या नजीक असायचो. मी माझ्या बर्‍याच कल्पना त्याला सांगायचो. त्यातल्या बऱ्याच तो नाकारायचाही.. पण एखादी कल्पना आवडल्यास तो माझ्याबरोबर काही गोष्टींवर चर्चा देखील करत असे. मैदानात असताना त्याचं नेहमी माझ्यावर बारीक लक्ष असायचं. मी त्याच्याकडून शिकत राहिलो आणि माझ्या जिज्ञासेमुळे कदाचित त्याला असा विश्वास वाटला की माझ्यानंतर हा संघाचे नेतृत्व करू शकतो”, असे विराटने सांगितले.

“धोनी कर्णधार पदावरून पायउतार झाल्यावर लगेच मला कर्णधारपद मिळालं, असं लोकांना वाटतं. पण मला असं वाटत नाही की निवडकर्त्यांनी मला अचानक भारतीय कर्णधार म्हणून निवडलं असेल. कदाचित माझी निवड करण्याआधी त्यांनी धोनीला माझ्याबद्दल मत विचारलं असणार. म्हणूनच मला विश्वास आहे की भारताचे कर्णधारपद मिळण्यात धोनीने महत्वाची भूमिका बजावली”, असेही विराट म्हणाला.