सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भारतीय संघाचा कप्तान विराट कोहलीनं तूच खरा रीयल मास्टर ब्लास्टर असल्याचे कौतुकाचे व आदराचे उद्गार काढले आहेत. मंगळवारी सचिननं वयाची पंचेचाळिशी पार केली आहे. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सचिनचा चाहता असलेला व सध्याचा जगातला सगळ्यात उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवला जात असलेल्या विराटनंही ट्विटरच्या माध्यमातून सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन तेंडुलकरचे विक्रम कुणी मोडू शकेल का या प्रश्नाचं उत्तर अनेकजण विराट कोहली असं देतात. कोहलीनं आत्ताच एकदिवसीय सामन्यात 35 शतकं झळकावली असून सचिनचा 49 शतकांचा विक्रम तो मागे टाकण्याची शक्यता आहे. जर कोहलीनं माझा विक्रम मोडला तर मी त्याला शँपेनच्या बाटल्या पाठवणार नाही, तर आपण स्वत: शँपेनची बाटली घेऊन विराटच्या भेटीला जाऊ आणि तो विक्रम साजरा करू असं सचिननं म्हटलं होतं.

लहानपणापासून सचिन हे दैवत असलेल्या विराटनं म्हटलंय की मी सचिनची फलंदाजी बघत बघत माझं क्रिकेट मधलं करीअर घडलंय. विराट 2008 मध्ये भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये दाखल झाला. त्यानंतर सचिन हळूहळू निवृत्तीकडे झुकायला लागला, परंतु विराट व सचिनमध्ये चांगले संबंध तयार झाले आणि दोघेही एकमेकांचे प्रशंसक बनले आहेत.

माझ्यावर सचिनचा प्रचंड प्रभाव असून जसा मी घडतोय तसा तो प्रभाव जास्त जाणवत असल्याचंही विराटनं म्हटलं आहे. इंग्लंडमध्ये 2014च्या दौऱ्यात विराटला अपयशाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी तो सल्ल्यासाठी सचिनला भेटला आणि त्यानंतर पुन्हा जोशानं क्रिकेट खेळायला लागला. त्यानंतरच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात विराटनं चार कसोटी सामन्यांमध्ये चार शतकं झळकावली आणि तेव्हापासून त्यानं मागं वळून बघितलेलं नाही.