इंग्लंडनं कसोटी मालिकेत भारताला 4-1 अशी धूळ चारली असली तरी विराट कोहलीला भारतीय संघ सर्वोत्तम असल्याचंच वाटत आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गेल्या 15 वर्षांमधला सर्वोत्कृष्ट संघ असं भारतीय संघाचं वर्णन केलं होतं. याबद्दल बोलताना विराट कोहलीनंही, “तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात, असा विश्वास बाळगायचा असतो,” असं सांगत तुम्हाला काय वाटतं? असा प्रतिप्रश्नही केला आहे. या प्रश्नावर खात्रीनं सांगता येत नाही असं उत्तर पत्रकारानं दिल्यानंतर हे तुमचं मत आहे असे उद्गार विराटनं काढले.

मानहानीकारक पराभवानंतर भारतीय कर्णधारानं पत्रकारांशी काही वेळ संवाद साधला. भारतानं दिलेल्या लढ्याला दर्शकांनी महत्त्व दिले नसल्याचे व त्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यानं व्यक्त केली. लोकं सोयीस्कररीत्या एकाच बाजुला झोडपून काढतात, असा खेदही कोहलीनं व्यक्त केला आणि त्याबरोबरच पण ते ठीकच आहे असे उद्गारही काढले. इंग्लंड दौऱ्यादरम्यान क्रिकेटच्या मैदानात खेळताना दीर्घकाळासाठी आम्ही दडपण झेलू शकलो नाही, अशी कबुली यावेळी विराटनं दिली आहे.

आमच्यावर असलेल्या दडपणाचा मात्र इंग्लंडनं अचूक फायदा उठवला असं सांगत, आम्हाला खूप काही बदल करायची गरज आहे असं वाटत नाही असं कोहली म्हणाला आहे. प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच आम्ही खेळलो, त्यामुळे आम्हाला आमच्या वृत्तीत बदल करण्याची गरज नसल्याचे विराट म्हणाला. कसोटी मालिका 4-1 अशा फरकानं गमावली असली तरी या आकडेवारीतून खेळ किती स्पर्धात्मक झाला हे स्पष्ट होत नसल्याचे तो म्हणाला आहे. कसोटी क्रिकेटसाठी चुरशीची झालेली ही मालिका म्हणजे उत्कृष्ट जाहिरात होती असा दाखलाही त्यानं दिला आहे.