भारताच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी कर्णधार विराट कोहलीने जोमाने तयारी करण्याचं ठरवलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, विराट कोहली इंग्लंड दौरा सुरु होण्याआधी ‘सरे’ या क्रिकेट क्लबकडून काऊंटी क्रिकेट खेळण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा हाती आल्यानंतर प्रत्येक संघाविरुद्ध विराट कोहलीने धावांचा रतीब घातला आहे. मात्र इंग्लंड दौऱ्यात विराटची कामगिरी अजिबात चांगली झालेली नाहीये. २०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यात विराटने ५ कसोटी सामन्यांत १३.४० च्या सरासरीने अवघ्या १३४ धावा काढल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्यात आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी विराटने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

सरे क्लबकडून काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी विराट कोहली १४ जूनपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जातंय. याआधीही भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी विराट कोहलीला इंग्लंडमध्ये फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी काऊंटी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी विराटने कपिल देव यांचा सल्ला ऐकण्याचं ठरवलेलं दिसतं आहे.

अवश्य वाचा – BLOG – ट्रॉफी जिंकलो कार्तिकमुळे, चर्चा मात्र कोहली, धोनीचीच!

भारत आपल्या आगामी इंग्लंड दौऱ्यात ५ कसोटी, ३ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. आफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिकेत २-१ असा पराभव स्विकारावा लागल्यानंतर आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरताना दिसणार आहे. ९ ते २८ जून या कालावधीत विराट कोहली सरे क्लबकडून हॅम्पशायर, सोमरसेट आणि यॉर्कशायर या ३ संघांविरोधात सामना खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे आगामी इंग्लंड दौऱ्यात विराटच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – ‘अ+’ श्रेणी हा धोनी व कोहलीचा प्रस्ताव!