टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडीज संपूर्ण दौऱ्यावर जाणार असल्याचे निश्चत झाले आहे. ३ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत असलेल्या या दौऱ्यात तीन टी – २० सामने, तीन एकदिवसीय सामने व दोन कसोटी सामने खेळले जाणार आहे.

या अगोदर एकदिवसीय आणि टी – २० सामान्यांसाठी विराटला आराम देण्यात आला होता. मात्र आता विराट भारतीय संघाबरोबर वेस्ट इंडीजच्या संपूर्ण दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड शुक्रवारी केली जाणार आहे.

विश्वचषकात उपांत्य सामन्यातीप पराभवानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. बीसीसीआयने या अगोदर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना टी -२० आणि वनडे साठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रोहित शर्माला वेस्ट इंडीज विरूद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे आणि टी – २० मालिकांसाठी कर्णधार बनवण्याचे जवळपास निश्चित वाटत होते. मात्र आता विराट संपूर्ण दौऱ्यावर येणार असल्याने भारतीय संघाच नेतृत्व तोच करणार आहे. विराटने वेस्ट इंडीजच्या संपूर्ण दौऱ्यावर न जाण्याचा आपला निर्णय बदला असल्याचे आता बोलले जात आहे.

भारताने ऑस्ट्रेलिया दौरा केल्यापासून विराट सतत खेळत आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात वनडे सामन्यासाठी संघ निवडी अगोदर त्याला न्यूझीलंडमध्ये दोन वनडे आणि टी -२० मालिकेसाठी आराम दिला होता. आता वेस्ट इंडीजच्या संपूर्ण दौऱ्यावर विराट जात असल्याने भारतीय संघाच्या फलंदाजीस आणखी बळकटी येणार आहे.