आक्रमक पवित्रा आणि वैयक्तिक प्रदर्शनासह संघासमोर ठेवलेले उत्कृष्ट उदाहरण यामुळे विराट कोहलीकडे भारतीय कसोटी संघाचे नियमित कर्णधारपद सोपवावे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले.
 कोहली क्रमवारीत अव्वल वीसमध्ये
ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मायभूमीत दोन्ही डावांत शतकाचा विक्रम विशेष आहे. अ‍ॅडलेड कसोटीतील कोहलीची भूमिका पाहून निवडसमितीला त्यालाच कसोटीचा कायमस्वरूपी कर्णधार करण्याचा मोह होऊ शकतो. कसोटी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचा काळ ओसरला आहे. संक्रमणाची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.
नियमित कर्णधारपदासाठी लागणारे धैर्य त्याच्याकडे आहे. संघाला पुढे नेण्याची क्षमता त्याच्यात आहे. मिचेल जॉन्सनचा उसळता चेंडू हेल्मेटवर आदळल्यानंतरही कोहलीने निग्रहाने  शानदार व प्रेरणा मिळेल अशा खेळी  साकारल्या. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघासमोरही दडपणाखाली न येता खेळ करण्याची त्याची वृत्ती कौतुकास्पद आहे. नियमित कर्णधार होण्यासाठी त्याला आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रतिस्पर्धी खेळाडूंनी चिथावल्यास, त्यांना बॅटनेच उत्तर देण्याची कला त्याने आत्मसात करायला हवी, असा सल्ला चॅपेल यांनी दिला.