आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानने भारताचा मानहानीकारक पराभव करत पहिल्यांदाच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारतीय कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानी संघाचे कौतुक केले आहे. ‘पाकिस्तानी संघाचा दिवस असतो, त्यावेळी हा संघ जगातील कोणत्याही संघाला पराभूत करु शकतो,’ अशा शब्दांमध्ये कोहलीने प्रतिस्पर्ध्यांचे कौतुक केले.

भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र तरीही कोहलीने पाकिस्तानच्या शानदार खेळाचे कौतुक केले. ‘पाकिस्तानी संघाचे अभिनंदन. त्यांच्यासाठी यंदाची स्पर्धा शानदार होती,’ असे कोहलीने म्हटले. ‘ज्याप्रकारे त्यांनी परिस्थिती बदलली, ते कौशल्य पाकिस्ताने संघाची क्षमता दाखवून देते. पाकिस्तानी संघाचा दिवस असल्यास ते कोणत्याही संघाला नमवू शकतात आणि ते त्यांना पुन्हा एकदा दाखवून दिले आहे,’ अशा शब्दांमध्ये कोहलीने पाकिस्तानचे कौतुक केले.

‘आमची कामगिरी निराशाजनक झाली. मात्र तरीही माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे. कारण आम्ही चांगले खेळून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलो आहोत. मला माझ्या संघाचा अभिमान वाटतो. अंतिम फेरीतील यशाचे पूर्ण श्रेय पाकिस्तानला जाते. त्यांनी सामना एकतर्फी केला,’ असेही कोहलीने पुढे बोलताना म्हटले. पाकिस्तानी खेळाडूंचे कौतुक करण्यावरच न थांबता कोहली त्यांच्या आनंदात सहभागीदेखील झाला. पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत बातचीत करत आणि अगदी हसतखेळत विराट कोहलीने खिलाडूवृत्तीचा परिचय दिला. विशेष म्हणजे विराट कोहली पाकिस्तानच्या खेळाडूंच्या आनंदात सहभागी होत असल्याचा व्हिडिओ आयसीसीने ट्विट केला आहे.

भारताला पराभूत करत पाकिस्तानने पहिल्यांदाच चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरले. मात्र पाकिस्तानच्या विजयामुळे तिसऱ्यांदा चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले. कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचा अंतिम फेरीपर्यंत प्रवास अतिशय चांगला होता. मात्र अंतिम फेरीत भारतीय संघ पूर्णपणे ढेपाळला.