भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने सध्या एकामागोमाग विक्रम रचण्याचा सपाटा लावला आहे. एरवी मैदानावर धावांचा रतीब घालून विक्रम रचणाऱ्या विराटने आता मैदानाबाहेरही नवा विक्रम रचला आहे. त्याने क्रीडा साहित्य निर्मितीमध्ये आघाडीवर असणाऱ्या ‘पुमा’ कंपनीशी ११० कोटींचा करार केला आहे. एकाच कंपनीशी इतक्या मोठ्या रकमेचा करार करणारा विराट पहिलाच क्रीडापटू ठरला आहे. त्यामुळे विराट आता जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट, असाफा पॉवेल, फुटबॉलपटू थिअरी हेन्री , ऑलिव्हर जिरूड या जागतिक ब्रँड अॅम्बेसिडरच्या पंक्तीत सामील झाला आहे.

‘पुमा’ने विराटसोबत केलेला हा करार आठ वर्षांचा आहे. पुमाने याआधीही अनेक दिग्गज क्रीडापटूंसोबत करार केला आहे. अशा खेळाडूंच्या यादीत सामील होणे, ही माझ्यासाठी बहुमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया विराटने व्यक्त केली आहे. यापूर्वी तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी विविध एजन्सी आणि कंपन्यांसोबत १०० कोटींचे करार केले होते. मात्र, विराटने एकाच कंपनीसोबत एवढ्या मोठ्या रकमेचा करार करून विक्रम प्रस्थापित केला आहे.

गेल्या वर्षात कोहलीने ब्रॅण्डव्हॅल्यूच्या माध्यमातून तब्बल ६०० कोटींची कमाई केल्याची माहिती ‘डफ अँड फेल्प्स’ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून पुढे आले होते. कोहलीने गेल्या वर्षभरात केलेली अफलातून कामगिरी आणि त्याच्या आकर्षक लूकमुळेच जाहिरातदारांची पसंती त्याला जास्त आहे. आपल्या उत्पादनाचे ब्रॅण्डींग कोहलीने करावे यासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत, असे डफ अँड फेल्प्सचे संचालक अविरल जैन यांनी सांगितले. कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर कोहलीच्या ब्रॅण्डव्हॅल्यूमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली. चार मालिकांमध्ये सलग चार द्विशतकं ठोकण्याचा पराक्रम कोहलीने ठोकून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. याबाबत कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकले. सध्याच्या घडीला कोहली २० अधिक ब्रॅण्डचे प्रमोशन करत आहे. यात जिओनी, अमेरिकन टुरिस्टर अशा मोठ्या ब्रॅण्डचाही समावेश आहे.