अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडचा दहा विकेटनं दारुण पराभव केला. या विजयासाह चार कसोटी सामन्याच्या मालिकेत भारतीय संघान २-१ नं आघाडी घेतली आहे. अक्षर पटेल आणि आर. अश्विनच्या फिरकीच्या जोरावर भारतीय संघानं इंग्लंडला चारीमुंड्या चीत केलं. या दणदणीत विजयानंतरही विराट कोहलीनं नाराजी व्यक्त केली आहे.

सामन्यानंतर बोलताना विराट कोहलीनं आपली नाराजी जाहीरपणे बोलूण दाखवली. दोन्ही संघातील फलंदाजांनी खराब प्रदर्शन केलं. आणखी चांगली फलंदाजी होऊ शकली असती. दुसऱ्या डावांत आम्ही तीन गड्यांच्या मोबदल्यात ९९ धावा काढल्या होत्या. मात्र, त्यानंतर फलंदाजी ढेपाळली. भारतीय संघ १४५ धावांत गारद झाला. आम्ही आणखी धावा काढू शकलो असतो. खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती, असं विराट म्हणाला.

भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला की, ‘खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती. चेंडू बॅटवर व्यवस्थित येत होता. विशेषकरुन पहिल्या डावांत.’ खेळपट्टीवर चेंडूला अतिरिक्त स्विंग मिळत असल्याच्या चर्चेवर विराट कोहलीनं सहमती दर्शवली नाही. तो म्हणाला, ‘हे विशेष आहे की, सामन्यात पडलेल्या तीन विकेटपैकी २१ विकेट सरळ चेंडूवर पडल्या आहेत. म्हणजेच चेंडूला जास्त स्विंग किंवा टर्न मिळत नव्हता. कसोटीत बचावात्मक फलंदाजीवर विश्वास ठेवावा लागतो.’ विराट कोहली फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीवर नाराज होता. तो म्हणाला की, ‘फलंदाजांनी खेळपट्टीवर संयम दाखवला नाही, त्यामुळेच सामना दोन दिवसात संपुष्टात आला.’