भारतीय संघाने नुकतीच बांगलादेश विरूद्ध टी २० मालिका जिंकली. पहिला सामना भारताने गमावला होता. पण त्यानंतर पुढील दोनही सामने भारताने दमदार खेळ करून जिंकले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका २-१ असा जिंकला. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट शर्मा याला विश्रांती देण्यात आली होती. पण उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी मात्र तो भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. या आधी विराटने एक महत्वाची आठवण सांगितली आहे.

मानसिक आणि शारीरिक ताण येऊ नये म्हणून BCCI ने विराटला विश्रांती दिली होती. पण काही वर्षांपूर्वी मात्र विराटला मानसिक तक्रारींना सामोरे जावे लागले होते. याबाबत विराटने गुपित उघड केले आहे. २०१४ मध्ये भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. त्यावेळी विराटला एकही अर्धशतक झळकावता आलेले नव्हते. त्या वेळेबाबत विराटने मन मोकळे केले.

“माझ्या क्रिकेट कारकिर्दीत असाही एक क्षण आला होता जेव्हा मला वाटलं की आता सगळं संपलं. काय करावं, कोणाशी काय बोलावं, कसं बोलावं, कोणाशी कशाप्रकारे संपर्क साधावा, ते मला काहीही कळत नव्हतं. प्रामाणिकपणे सांगायचे तर प्रत्येकाला स्वत:चे काम असते. त्यामुळे समोरच्या व्यक्तिच्या मनात नक्की काय सुरू आहे हे समजणे खूप कठीण आहे. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळता तेव्हा संघातील प्रत्येक खेळाडूने संवाद साधायला हवा. प्रत्येकाने आपले विचार इतरांच्यासमोर मोकळेपणाने मांडायला हवेत”, असे विराट म्हणाला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि निक मॅडीसन यांनी मानसिक ताण आणि समस्यांमुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. तसेच इंग्लंडचा स्टीव्ह हारमिसन, मार्कस थेस्कॉटिच आणि ग्रॅम फ्लावर यांनाही डिप्रेशनच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.