भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नेहमीच भारतीय फुटबॉलचा समर्थक राहिला असून वेळोवेळी पाठिंबा दर्शवला आहे. इंडियन सुपर लीगमध्ये एफसी गोवा संघाच सह-मालक असण्यापासून ते फुटबॉल खेळाडूंसाठी प्रेरणादायी संदेश पाठवण्यापर्यंत अनेकदा त्याने आपलं फुटबॉल प्रेम व्यक्त केलं आहे. शनिवारी कोहलीने भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याच्या आवाहनाला पाठिंबा देत चाहत्यांना फुटबॉल सामना पाहण्याची विनंती केली. सचिन तेंडुलकर आणि कोहलीसारख्या स्टार खेळाडूंनी केलेल्या आवाहनामुळे सुनील छेत्री आणि संघाला पाठिंबा देण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. केनियाविरोधातील सामन्याची सर्व तिकीटं विकली गेली होती. भारताने ३-० ने केनियाचा पराभव केला. दरम्यान या विजयानंतर विराट कोहलीने ट्विटरवर भारतीय संघ आणि कर्णधार छेत्रीसाठी एक विशेष संदेश पाठवला आहे.

ट्विटरवर पाठवलेल्या आपल्या मेसेजमध्ये विराट कोहलीने लिहिलं आहे की, ‘गेली दोन वर्ष भारतीय फुटबॉलसाठी सर्वोत्तम राहिली आहेत. गेल्या रात्री त्यांनी आपण किती एकनिष्ठ आहोत हे दाखवून दिलंय. केनियाविरोधात ३-० चा मोठा विजय. वेल डन चॅम्प’.

आपल्या कारकिर्दीचा १०० वा सामना खेळणाऱ्या सुनील छेत्रीने इंटरकॉन्टिनेंटल चषकात दोन गोल झळकावले. अंधेरीतल्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने केनियावर ३-० अशी मात केली. भारताचा या स्पर्धेतला हा दुसरा विजय ठरलेला आहे. क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी झालेली गर्दी पाहून सुनील छेत्री भारावला आहे. सामना संपल्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून लोकांचे आभार मानत असा पाठिंबा दिलात तर मैदानात जीवही देऊ असं म्हटलं.

सुनील छेत्रीने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की जर आम्हाला देशासाठी खेळताना नेहमी असा पाठिंबा मिळाला तर मैदानात आमचा जीवही देऊ. ही रात्र स्पेशल होती कारण आपण सगळे एकत्र होतो. स्टॅण्डमध्ये उभे राहून ओरडणारे आणि घरी बसून चिअर करणाऱ्यांचे आभार’.

केनियावर ३-० ने मात –
पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल झळकावण्यात अपयश आलं. मात्र दुसऱ्या सत्रात भारताने आघाडी घेत सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. यानंतर जेजे ने ७१ व्या मिनीटाला गोल झळकावत भारताची आघाडी २-० ने वाढवली. यानंतर दुसऱ्या सत्राच्या अतिरीक्त वेळेत कर्णधार छेत्रीने ९१ व्या मिनीटाला आणखी एक गोल झळकावत भारताला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. केनियाचा दुबळा बचाव भारताच्या आक्रमण करणाऱ्या फळीला थांबवू शकला नाही. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.