नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा धमाकेदार फलंदाज स्टिव्ह स्मिथ याने १ वर्षांच्या बंदीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने अ‍ॅशेस मालिकेत ७ डावांत तब्बल ७७४ धावा केल्या. त्याच्या या यशस्वी पुनरागमनानंतर पुन्हा एकदा त्याच्या आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या तुलनेची चर्चा सुरु झाली आहे. अनेक दिग्गजांनी या दोघांबद्दल विविध मते मांडली आहेत. काही दिवसांपूर्वी माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने याबाबत मत मांडले होते.

त्यात आता दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्स यानेही त्याचे मत व्यक्त केले आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना ऱ्होड्स म्हणाला की, ‘मला विराट कोहलीला खेळताना पहायला आवडते. स्मिथ त्याच्या अनोख्या शैलीने फलंदाजी करतो. मी आत्तापर्यंत पाहिलेल्या फलंदाजांपैकी सर्वात वाईट किंवा विचित्र पद्धतीने शतक झळकावणारी त्याची शैली आहे. पण तरीही तो धावा करतच राहतो हे सत्य आपण नाकारू शकत नाही. पण क्रिकेटप्रेमी स्मिथच्या एखाद्या फटक्यावर जर ‘मस्त फटका मारला’ असं म्हणत असेल, तर मी मात्र त्याउलट विचार करतो. ‘या पृथ्वीवर क्रिकेट खेळणारा असा फटका मारुच कसा शकतो?’ असं मी स्मिथच्या बाबतीत म्हणतो. त्यामुळे माझ्या मते तरी सध्या विराट कोहलीच सरस आहे, असे सांगत ऱ्होड्सने विराटची सर्वोत्तम फलंदाज म्हणून निवड केली.

विराट कोहली की स्टीव्ह स्मिथ?; शेन वॉर्नने दिलं हे उत्तर

याशिवाय, सध्याचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण? यावरही त्याने उत्तर दिले. ऱ्होड्सने म्हणाला की मार्टिन गप्टिल हा उत्तम क्षेत्ररक्षक आहे. तसेच रविंद्र जाडेजादेखील चांगला आहे, पण त्याला अजून पुरेसा वेळ मिळालेला नाही. “जाडेजाला अजून पुरेसा वेळ मिळालेला नाही. गप्टिलने मात्र प्रत्येक सामना खेळला आहे. गप्टील स्लीपमध्ये, कव्हर्सवर आणि सीमारेषेवर चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण करतो. तो एक चांगला अष्टपैलू क्षेत्ररक्षक आहे. जाडेजाकडे ‘एक्स फॅक्टर’ आहे. तो एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. पण मी मात्र गप्टिलला पसंती देईन”, असे ऱ्होड्स म्हणाला.