ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने दुखापतीतून सावरत पुनरागमन करताना कारकीर्दीतील तिसरे द्विशतक झळकावले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात पहिल्या डावात ८ बाद ४९७ धावांपर्यंत मजल मारली. तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने १ बाद २३ धावा केल्या. या मालिकेत त्याने या आधीही दोन शतके झळकावली आहेत. त्याच्या या खेळीनंतर पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांच्यात सरस कोण याची चर्चा रंगू लागली आहे. या मुद्द्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने आपले मत व्यक्त केले आहे.

“कसोटी क्रिकेटबद्दल जर मला विचारलेत तर मी विराटपेक्षा स्टीव्ह स्मिथला सरस मानतो. कसोटी संघात मला फक्त एकाची निवड करायची असेल, तर मी स्मिथला संधी देईन. हा निर्णय घेणे खरंच खूप कठीण असेल, पण काही आघाड्यांवर मला स्मिथ कोहलीपेक्षा सरस वाटतो, मी स्मिथला संधी देईन. जर स्मिथ उपलब्ध नसेल आणि माझ्या संघात कोहलीला स्थान देण्यात आले तरी मला त्याचा आनंदच असेल कारण कोहलीदेखील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे”, असे वॉर्न म्हणाला.

“विराट हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. तीनही प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये जर मला एक खेळाडू निवडायचा असेल तर मात्र मी विराट कोहलीला पसंती देईन. विंडिजचे सर व्हिव्हियन रिचर्ड्स हे मी माझ्या आयुष्यात पाहिलेले एकदिवसीय क्रिकेटमधील आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहेत. त्यांच्यानंतर आताच्या घडीला मला कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू वाटतो. विराट सध्या व्हिव्ह रिचर्ड्स यांच्याही पुढे निघून गेला आहे, असेही मत वॉर्नने व्यक्त केले.

दरम्यान, अ‍ॅशेस मालिकेत दुसऱ्या दिवशी ३ बाद १७० धावसंख्येवरून खेळाला सुरुवात झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेडचा (१९) बळी गमावला. त्यानंतर मॅथ्यू वेडलाही (१६) मोठी खेळी करण्यात अपयश आले. ५ बाद २२४ अशी स्थिती असताना स्मिथने कर्णधार टिम पेनच्या साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या गडय़ासाठी १४५ धावांची अभेद्य शतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत आणले. स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर दोन धावा काढून स्मिथने द्विशतक साकारले. स्मिथने २४ चौकार व २ षटकारांसह २११ धावा केल्या.