कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आगामी वर्षात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआय भारताचा टी-२० संघ मजबुतीने बांधण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या दोन सामन्यात भारतीय खेळाडूंनी अनेक विक्रम आपल्या नावे जमा केले आहेत. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केवळ एक चौकार लगावत, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात मानाचं स्थान पटकावलं आहे.

पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या ९६ धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजीची दाणादाण उडाली होती. रोहित शर्मा विराट कोहली आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने ४ गडी राखून सामन्यात बाजी मारली. विराट कोहलीने पहिल्या सामन्यात २९ चेंडूत १९ धावा केल्या. या खेळीत विराट कोहली केवळ एक चौकार लगावू शकला. मात्र यादरम्यान विराट आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधक चौकार मारणारा खेळाडू ठरला आहे. विंडीजविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात मारलेला एकमेव चौकार हा त्याच्या टी-२० कारकीर्दीतला २२४ वा चौकार होता. विराटने श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानला मागे टाकलं.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज –

  • विराट कोहली (भारत) – २२४ चौकार
  • तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) – २२३ चौकार
  • मोहम्मद शेहजाद (पाकिस्तान) – २१८ चौकार
  • रोहित शर्मा (भारत) – २०९ चौकार
  • मार्टिन गप्टील (न्यूझीलंड) – २०० चौकार
  • ब्रँडन मॅक्युलम (न्यूझीलंड) – १९९ चौकार

पहिल्या टी-२० सामन्यात भारताने विंडीजने विजयासाठी दिलेलं ९६ धावांचं आव्हान ६ गडी गमावत १७.२ षटकात पूर्ण केलं होतं.

अवश्य वाचा – टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा विक्रम, सुरेश रैनाला टाकलं मागे