अफगाणिस्तान कसोटी आटोपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. ३ जुलैपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात भारत ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघात सहभागी होण्यासाठी बीसीसीआयने सर्व खेळाडूंना यो-यो फिटनेस चाचणी देणं बंधनकारक केलं आहे. काही दिवसांपूर्वी वन-डे संघात निवड झालेल्या अंबाती रायडूला फिटनेस चाचणीत नापास झाल्यामुळे संघाबाहेर जावं लागलं होतं. यानंतर बीसीसीआयने सुरेश रैनाची अंबाती रायडूच्या जागी संघात निवड केली. मध्यंतरी विराट कोहलीच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र फिटनेस चाचणीत पास झाल्यानंतर विराटने इंग्लंड दौऱ्यासाठी कसून सराव करायाला सुरुवात केली आहे.

आयपीएलचा हंगाम आटोपल्यानंतर कर्णधार विराट कोहली इंग्लंड दौऱ्यासाठी काऊंटी क्रिकेटमध्ये सहभागी होणार होता. मात्र दुखापतीमुळे त्याला काऊंटी क्रिकेटमधून माघार घ्यावी लागली. यानंतर महेंद्रसिंह धोनी, भुवनेश्वर कुमार, सुरेश रैना या खेळाडूंसोबत विराटने बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत यो-यो फिटनेस चाचणी दिली. मात्र यादरम्यान विराटच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्या फिटनेस चाचणीचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. मात्र बीसीसीआय व संघाचे ट्रेनर यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर विराटने इंग्लंड दौऱ्यासाठी सरावाला सुरुवात केली आहे. यासाठी विराट जिममध्ये दररोज वर्कआऊट करतो आहे. आपल्या वर्कआऊटचे काही फोटो त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

याआधीही भारत अ संघातून संजू सॅमसनला यो-यो फिटनेस चाचणीत नापास ठरल्यामुळे संघातून बाहेर पडावं लागलं होतं. त्याजागी इशान किशनची संघात निवड करण्यात आली होती. यानंतर अफगाणिस्तान कसोटीआधी मोहम्मद शमी फिटनेस चाचणीत अनुत्तीर्ण झाल्याने त्याला संघातून माघार घ्यावी लागली होती. त्यापाठोपाठ अंबाती रायडूही संघातून बाहेर पडल्यामुळे भारतीय संघातल्या खेळाडूच्या शाररिक क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळे आगामी काळात यो-यो फिटनेस टेस्टमुळे कोणत्या खेळाडूच्या जागेवर संक्रांत येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.