विराट कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सध्या साऱ्यांना परिचयाचा आहे. गेल्या १० वर्षांपासून विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे. सुरुवातीच्या काळात विराट अत्यंत रागीट आणि आक्रमक खेळाडू म्हणून उदयास आला. पण आता तो एक परिपक्व खेळाडू म्हणून नावारूपाला आला आहे. विचार करून आणि संयमाने मैदानावर तो निर्णय घेताना दिसतो. पण सुरुवातीच्या काळात कोहलीने एक आक्षेपार्ह कृती केल्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. मात्र त्याबाबत विराटला अजिबात वावगे वाटले नव्हते, असे त्याने सांगितले.

विराट म्हणाला की २०१२मध्ये ऑस्ट्रेलियात आम्ही सामना खेळत होतो. त्यावेळी प्रेक्षांकडे पाहून मी मधले बोट दाखवण्याची कृती केली. मला त्याय काहीच वावगे वाटले नव्हते. पण दुसऱ्या दिवशी सामनाधिकारी रंजन माडुगले यांनी मला बोलावले आणि ‘काल सीमारेषेजवळ काय झाले?’ असे मला विचारले. मी त्यांना सांगितले की थोडी बाचाबाची झाली. त्यावर सामानाधिकाऱ्यांनी माझ्या अंगावर वर्तमानपत्र फेकले. त्या वर्तमानपत्रात मोठ्या आकाराचा माझा फोटो छापण्यात आला होता आणि त्या फोटोत मी मधले बोट प्रेक्षकांना दाखवत असल्याचे दिसले.

ते चित्र आणि बातमी पाहून मी घाबरलो. मी सामनाधिकऱ्यांना विनंती केली की त्यांनी मला निलंबित करू नये. मी नवोदित आहे आणि तरुण आहे. त्यामुळे अशा गोष्टी चुकुन घडतात. ही बाब लक्षात घेत त्यांनी माझ्यावर कारवाई केली नाही. केवळ मला ताकीद देऊन सोडून दिले, असेही विराटने सांगितले.