ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. कोहली ब्रिगेडचा तब्बल ३३३ धावांनी पराभव झाला. याआधीच्या मालिकेत दमदार फॉर्मात असलेल्या विराट कोहलीकडून या सामन्यात निराशजनक कामगिरी झाली. पहिल्या डावात कोहली शून्यावर, तर दुसऱया डावात केवळ १३ धावा करून बाद झाला. अवघ्या तीन दिवसांत कसोटीचा निकाल लागला. भारतीय संघाच्या या दारुण पराभवाची ही काही पहिली वेळ नाही. याआधी २००१ साली माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पराभवाने केलेली सुरूवात केली होती. मात्र, संघाने कमबॅक करत मालिका विजय साजरा केला होता. यावेळी हिच संधी विराट कोहलीकडे असणार आहे. भारतीय संघाचा सुरूवात खराब झाली असली तरी बंगळुरू कसोटीत पुनरागमन करून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्याची संधी भारतीय संघाला असणार आहे.

१६ वर्षांपूर्वी गांगुलीच्या नेतृत्त्वात हरभजन सिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण या दोन शिलेदारांच्या अफलातून खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मात दिली होती. भारतीय संघाच्या पराभवानंतर खुद्द गांगुलीनेही कोहलीला पाठिंबा दिला आहे. कोहली देखील एक माणूस आहे. त्यामुळे कधी ना कधी पराभव पदरी येतोच. कोहली पुण्यातील कसोटीत दोन्ही डावात अपयशी ठरला. ऑफ साईडवर खेळण्यात कोहलीला कठीण जात असल्याचे तेव्हा दिसून आले होते. पण बंगळुरू कसोटीतही तशीच परिस्थिती असेल असे नाही. संघ नक्की पुनरागमन करेल, असे गांगुली म्हणाला.

 

२००१ साली गांगुलीच्या संघासाठी हरभजनने जी भूमिका पार पाडली. ती जबाबदारी कोहलीच्या संघात अश्विनच्या खांद्यावर आहे. विराट चांगल्या फॉर्मात आहे. सलग चार कसोटी मालिकेत द्विशतकी कामगिरी करणे ही काही सोपी गोष्ट नाही. अशी कामगिरी तर सचिन तेंडुलकरलाही शक्य झाली नाही, असेही गांगुली म्हणाला.

पुण्यातील पराभव हा भारतीय संघासाठी शिकण्याची संधी होता, असे समजून पुढे जाण्याची गरज व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्यातील कसोटीपूर्वी भारतीय संघाची कामगिरी अफलातून राहिली आहे. भारताने तब्बल १९ कसोटी सामने लागोपाठ जिंकले होते.