गल्लीत मोकळेपणाने भटकणाऱ्या कुत्र्यांना आपणच त्या परिसरातील वाघोबा असल्याचे वाटत असते, मात्र त्यांना जंगलात सोडले तर पळता भुई थोडी होते. भारतीय क्रिकेट संघाबाबत असेच पाहावयास मिळाले. मायदेशातील अनुकूल खेळपट्टय़ांवर प्रतिस्पर्धी संघांवर सहज विजय मिळविल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतही तशीच दादागिरी करता येईल असे त्यांना वाटले होते, मात्र आफ्रिकेतील खेळपट्टय़ांवर त्यांना तशी दादागिरी करता आली नाही. तिसऱ्या कसोटीत विजय मिळवत भारतीय खेळाडूंनी काहीअंशी लाज राखली, मात्र पहिल्या दोन कसोटीतील हाराकिरी ही आत्मपरीक्षणाची बाब आहे.

भारतीय खेळाडूंची फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टय़ांवर नेहमीच हुकमत असते. तथापि, द्रुतगती व उसळत्या गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टय़ांवर त्यांचे फलंदाज केवळ हजेरी लावण्याचेच काम करतात़, असा अनेक वेळा अनुभव पाहावयास मिळाला आहे. त्यातही श्रीलंकेसह अनेक मातबर संघांवर घरच्या मैदानांवर वर्चस्व गाजवल्यानंतर फाजील आत्मविश्वास भारतीय खेळाडूंना वाटत होता. आफ्रिकेत कसोटी सामन्यांपूर्वी सराव सामने खेळण्याचे त्यांनी टाळले. त्यांची ही चाल अंगलट आली. फलंदाजी, क्षेत्ररक्षण व काही प्रमाणात गोलंदाजी या आघाडय़ांवर भारताच्या अनुभवी खेळाडूंच्या मर्यादा स्पष्ट दिसून आल्या. त्यातच हुकमी खेळाडूंना विश्रांती देण्याचे निर्णयही भारतीय संघाला मारक ठरले.

घरच्या मैदानांवर झालेल्या मालिकांमध्ये मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, कर्णधार विराट कोहली आदी फलंदाजांनी सातत्याने तळपत्या बॅटीने अनेक विक्रम नोंदवले. दुर्दैवाने गोलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर त्यांना अपेक्षेइतकी चमक दाखवता आली नाही. कोहलीचे शतक वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केली. उसळत्या चेंडूंना कसे सोडायचे हे तंत्र त्यांनी आत्मसात केले नसावे. त्याचप्रमाणे यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूंवर खेळण्याचा आततायी प्रयत्नही त्यांच्या अंगलट आला. एकदा चूक झाल्यानंतर ती सुधारण्याऐवजी पुन:पुन्हा त्याच चुका करीत त्यांनी पराभव ओढवून घेतला.

स्वयंपाक करणारे भरपूर तज्ज्ञ एकाच वेळी एकत्र येऊन स्वयंपाक करू लागले तर त्या पदार्थाचा विचका होतो असे म्हटले जाते. भारतीय संघाबाबत असेच दिसून आले. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक तंदुरुस्ती आदी सर्वच बाबत भारतीय संघासाठी प्रशिक्षक आहेत. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत या तज्ज्ञांनी नेमके काय केले याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. एखादा झेलदेखील सामन्याला कलाटणी देणारा असतो. दुर्दैवाने आपल्या खेळाडूंनी एवढी जीवदाने दिली की सरावाच्या वेळी त्यांना नेमके काय शिकवले जाते याचा ऊहापोह करण्याची आवश्यकता आहे. कोहलीचे मैदानावरील बेशिस्त वर्तन हे अनेक वेळा दिसून आले आहे. त्याबद्दल त्याला आर्थिक दंडही झाला आहे. अर्थात, कोटय़वधी रुपये मिळवणाऱ्या कोहलीला आर्थिक दंड किरकोळ वाटत असला तरीही त्याच्या अशा वर्तनामुळे संघाची मान खाली जात असते याचा विचार त्याने आणि संघ व्यवस्थापनानेही केला पाहिजे. मैदानावर व मैदानाबाहेर कसे वर्तन ठेवले पाहिजे हेदेखील खेळाडूंना शिकवले पाहिजे. आपण परदेशात दौऱ्यात क्रिकेट खेळायला आलो आहोत, पर्यटनाला नाही याचीही कल्पना या खेळाडूंना देणे आवश्यक आहे.

आफ्रिकेच्या द्रुतगती गोलंदाजांना योग्य टप्पा हेरून अचूक व भेदक गोलंदाजी करता येते, तर इशांत शर्मा याच्यासारख्या चार पावसाळे पाहिलेल्या वेगवान गोलंदाजाला तशी कामगिरी का करता आली नाही हा प्रश्नच आहे. महंमद शमी याला शेवटच्या कसोटीत सूर सापडला. तशी कामगिरी त्याने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये केली असती तर मालिकेचे चित्र वेगळे दिसले असते. त्या तुलनेत जसप्रीत बुमरा याच्या कामगिरीत आता परिपक्वता येऊ लागली आहे. हार्दिक पंडय़ा याच्या अष्टपैलुत्वाची तुलना कपिल देवशी केली जाते, मात्र कसोटीत पंडय़ाला स्थान देऊन निवड समितीने काय साधले हे एक कुतूहलच आहे.

मालिकेतील अंतिम अकरा खेळाडूंची निवड हा थट्टामस्करीचा विषय झाला. अजिंक्य रहाणे याला उपकर्णधारपद देण्यात आले होते. परदेशातील मैदानांवर तो यशस्वी फलंदाज मानला जातो. शंभर टक्के तंदुरुस्त असूनही त्याला पहिल्या दोन कसोटींमध्ये खेळविण्यात आले नाही. भुवनेश्वरकुमार हा भारतीय संघातील अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या फळीतील फलंदाजांना बाद करणारा हुकमी गोलंदाज म्हणूनही त्याची ओळख आहे. पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी करूनही दुसऱ्या कसोटीत त्याला डच्चू देण्यात आला. दुसऱ्या कसोटीतही मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने भुवी व रहाणे या दोघांना संघात पाचारण केले, मात्र तोपर्यंत आफ्रिकेचा मालिका विजय निश्चित झाला होता. कसोटी मालिका गमावल्यानंतर आता तरी संघ व्यवस्थापनाने अंतिम अकरा खेळाडूंची निवड करताना खेळाडूंची कामगिरी व योग्यता पाहण्याची गरज आहे, तरच भारतीय संघाची उर्वरित शान राखली जाईल.

खेळपट्टीचा बागुलबुवा

खेळपट्टी अपरिपक्व होती की नाही हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. अनेक क्रिकेट पंडितांनी वाँडर्सवरील खेळपट्टीबाबत भरपूर टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात भारताचा कसोटी सामना झाला होता. त्या वेळी आपल्या फिरकीस अनुकूल अशी खेळपट्टी तयार करण्यात आली होती. मात्र ऑस्ट्रेलियाचेच गोलंदाज आपल्याला शिरजोर ठरले व केवळ तीन दिवसांमध्ये त्यांनी सामना जिंकला. अनेक ठिकाणी खेळपट्टय़ांच्या दर्जाबाबत खूप चर्चा ऐकावयास मिळत असते. कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांची कार्यक्रमपत्रिका अनेक महिने अगोदर निश्चित केली जात असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या संबंधित समितीने या बाबत पुढाकार घेऊन खेळाडूंना मारक खेळपट्टी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

मिलिंद ढमढेरे milind.dhamdhere@expressindia.com