द. आफ्रिकेविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका आजपासून; सुरेश रैनाच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष

भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील मोठय़ा विजयानंतर ट्वेन्टी-२० मालिकेतही सातत्य राखण्यास उत्सुक आहे. उभय संघांमधील तीन सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात होईल.

विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी एकदिवसीय मालिका ५-१ अशा फरकाने जिंकत यजमानांवर वर्चस्व राखले. झटपट क्रिकेटला चांगलेच सरावल्याचे भारताने दक्षिण आफ्रिकेतील ऐतिहासिक मालिका विजयाने दाखवून दिले. ट्वेन्टी-२० मालिकेतही त्याच्याच पुनरावृत्तीसाठी भारताचा संघ मैदानात उतरेल.

भारताच्या दक्षिण आफ्रिकेतील ट्वेन्टी-२० प्रकारातील आठवणी संस्मरणीय आहेत. पाहुण्या संघाने २००६ मध्ये याच प्रकारातील पहिला विजय येथे मिळवला. त्यानंतर वर्षभराने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताने १० ट्वेन्टी-२० सामने खेळताना ७ सामने जिंकलेत.

ट्वेटी-२० प्रकारातही भारताची भिस्त फलंदाजी आणि फिरकी माऱ्यावर आहे. कर्णधार कोहलीसह सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने एकदिवसीय मालिकेमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवचे सातत्य जमेची बाजू ठरली आहे.

ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताच्या संघात सुरेश रैनासह लोकेश राहुल आणि जयदेव उनाडकटचा समावेश करण्यात आला आहे. सहाव्या एकदिवसीय लढतीपूर्वी या तिघांनी जवळपास अडीच तास कसून सराव केला. वॉन्डर्सवर शनिवारीही त्यांनी सरावात भाग घेतला.

रैनाच्या वाटय़ाला २०१५ नंतर एकही एकदिवसीय सामना आलेला नाही. ट्वेन्टी-२० मालिकेतही तो १२ महिन्यांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दिसला. अनुभव गाठीशी असला तरी लोकेश राहुल आणि मनीष पांडेमुळे रैनाला अंतिम संघात स्थान मिळणे, तितके सोपे वाटत नाही.

डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटही न्यूझीलंड दौऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळतोय. भारतीय संघात स्थान कायम राखण्यास तो इच्छुक आहे. जयदेवसह जसप्रीत बूमराह, शार्दूल ठाकूरवर तेज माऱ्याची मदार आहे.

दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेतील कामगिरीमध्ये सातत्य राखता आलेले नाही. एकदिवसीय मालिकेसह त्यांना आयसीसी अव्वल स्थानही गमवावे लागले. ट्वेन्टी-२० मालिका जिंकून यजमान संघ  मायदेशातील मालिकेचा शेवट ‘गोड’ करण्याचा प्रयत्न करतील. मात्र प्रमुख फलंदाजांना भारताच्या फिरकीपटूंविरुद्ध आलेले अपयश पाहता त्यांचा कस लागेल. एबी डी’विलियर्स, कर्णधार जेपी डय़ुमिनी आणि डेव्हिड मिलर या अनुभवी क्रिकेटपटूंचा खेळ बहरल्यास द. आफ्रिकेला विजयाची आशा बाळगता येईल.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, लोकेश राहुल, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बूमरा, जयदेव उनाडकट, शार्दूल ठाकूर.

दक्षिण आफ्रिका : जेपी डय़ुमिनी (कर्णधार), फरहान बेहार्डियन, ज्युनियर डॅला, एबी डी’विलियर्स, रीझा हेन्ड्रिक्स, ख्रिस्तियान जॉनकर, हेन्रिच क्लासीन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, डेन पीटरसन, आरोन फँगिसो, अँडिल फेडलुक्वायो, ताब्रेझ शाम्सी, जॉन-जॉन स्मट्स.

वेळ : सायं. ६ वा.

प्रक्षेपण : सोनी टेन १, ३.