बांगलादेशमध्ये होणारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली असताना भारतीय क्रिकेट संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दुखापतीमुळे या स्पध्रेतून माघार घेतली आहे. त्यामुळे विराट कोहलीकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. याचप्रमाणे राष्ट्रीय निवड समितीने धोनीऐवजी दिनेश कार्तिकची यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संघात निवड केली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात धोनीच्या डाव्या बरगडय़ांना दुखापत झाली होती. त्यामुळे धोनीला दहा दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.’’
 या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय निवड समितीने कोहलीकडे कर्णधारपद दिले आहे, तर तामिळनाडूचा यष्टीरक्षक-फलंदाज कार्तिकचा संघात समावेश केला आहे.
बांगलादेशमध्ये २५ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत आशिया चषक क्रिकेट स्पर्धा होणार असून, भारताचा सलामीचा सामना २६ फेब्रुवारीला बांगलादेशशी आहे. भारतासह परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.
न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ०-१ अशी हार पत्करली. या पाश्र्वभूमीवर धोनीच्या बचावात्मक नेतृत्वावर प्रखर टीका झाली. भारताने परदेशातील आपल्या चार कसोटी मालिका गमावल्या आहेत. ऑस्ट्रेलिया़, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या प्रतिस्पध्र्याकडून आपण सपाटून मार खाल्ला. परदेशातील २३ कसोटी सामन्यांत धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ५ सामने जिंकले आहेत, ५ सामने हरले आहेत तर ७ सामने अनिर्णित राहिले आहेत. या पाश्र्वभूमीवर धोनीला सक्तीची विश्रांती देण्यात आली आहे का, अशी शंकासुद्धा निर्माण होऊ शकते.