स्थानिक सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करणारा युवा फलंदाज के. एल. राहुलची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी संघात वर्णी लागली आहे. त्याचबरोबर १९ वर्षीय ‘लेग स्पिनर’ कर्ण शर्माचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. या संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीला देण्यात आले असले तरी दुखापतीमुळे तो पहिल्या कसोटी सामन्यामध्ये खेळू शकणार नाही. निवड समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेबरोबरच श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
सुरेश रैनाचे कसोटी संघात पुनरागमन झाले असून युवा यष्टीरक्षक फलंदाज नमन ओझालाही संघात स्थान देण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव संजय पटेल यांनी दिली.
संघाची निवड करताना निवड समितीने वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग, अमित मिश्रा आणि प्रग्यान ओझा या अनुभवी खेळाडूंना दूर ठेवले.
धोनीच्या हाताला दुखापत झाली असल्याने त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावे लागले होते. या दुखापतीतून तो सावरत असला तरी त्याला पहिल्या कसोटी सामन्यामध्ये खेळता येणार नाही, या सामन्यामध्ये विराट कोहली संघाची धुरा वाहणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापासून धोनी कर्णधारपद भूषवणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम दोन कसोटी सामन्यांसाठी सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागी संघामध्ये रॉबिन उथप्पा आणि रोहित शर्मा यांची निवड करण्यात आली आहे.
वेगवान गोलंदाज इशांत शर्मालाही संघातून वगळण्यात आले असून त्याच्या जागी विनय कुमारला संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेसाठी संघ :
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, नमन ओझा, आर. अश्विन, कर्ण शर्मा, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वरुण आरोन.

श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम दोन सामन्यांसाठीचा संघ :
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, अक्षर पटेल, कर्ण शर्मा, आर. अश्विन, उमेश यादव, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, विनय कुमार आणि केदार जाधव.