भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी काळात काउंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. सरे या काउंटी क्रिकेट क्लबने विराटला आगामी हंगामाकरता आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर विराट काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. सरे क्रिकेट क्लबच्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात घोषणा करण्यात आलेली आहे.

“काउंटी क्रिकेट खेळणं हे माझं स्वप्न होतं. ही संधी मला उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी सरे क्रिकेट क्लबचा आभारी आहे. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर मी त्वरीत काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे.” सरे क्लबशी करारबद्ध झाल्यानंतर विराटने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. स्थानिक काउंटी चॅम्पियनशीपमध्ये विराट सरेकडून ३ सामने खेळणार आहे.

२९ वर्षीय विराट कोहली हा काउंटी क्रिकेट खेळणारा चौथा भारतीय कसोटीपटू ठरला आहे. याआधी चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, वरुण अॅरॉन हे भारतीय खेळाडू काउंटी क्रिकेटमध्ये विविध संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर भारत अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, त्याआधी विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी काउंटी क्रिकेटचा अनुभव घेणं हा भारतीय संघासाठी आश्वासक मुद्दा ठरणार आहे.