न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली डग-आऊटमध्ये बसून वॉकी-टॉकीवर संवाद साधताना आढळला होता. यावेळी विराटचे मॅचदरम्यान संवाद साधतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, विराटकडून आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र या प्रकरणात आयसीसीने विराट कोहलीला क्लीनचीट देत या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

वॉकीटॉकी वापरण्यासाठी विराटने आमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती, असं स्पष्टीकरण आयसीसीने दिलं आहे. डगआऊट बसलेला संघ आणि ड्रेसिंग रुममधले सहकारी यांच्यात संवाद साधण्यासाठी वॉकीटॉकीचा वापर करण्यात येतो. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे स्थानिक अधिकारी बीरसिंह यांची परवानगी घेतली होती. बीरसिंह यांनी विराट कोहलीची वॉकीटॉकी तपासून घेतल्यानंतर विराटला वॉकीटॉकी वापरण्याची परवानगी दिली होती.

अवश्य वाचा – सौरव गांगुली आशिष नेहराला ‘पोपट’ का म्हणायचा? युवराज सिंगकडून उलगडा