अद्भुत सातत्याने धावा करणारा विराट कोहली अल्पावधीतच सचिन तेंडुलकरची जागा घेणार.. ‘प्रतीसचिन’ गवसला.. शोध संपला अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.. भारतीय उपखंडात खोऱ्याने धावा करणाऱ्या विराटची इंग्लंडमध्ये चेंडू स्विंग होणाऱ्या खेळपट्टय़ांवर दाणादाण उडाली.. पाच कसोटी, पाच एकदिवसीय आणि एकमेव ट्वेन्टी-२० लढतींमध्ये मिळून विराटला केवळ एक अर्धशतक करता आले.. कौशल्याची, तंत्राची कसोटी पाहणाऱ्या इंग्लंड दौऱ्यातील अपयशानंतर विराटने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे शिकवणीसाठी धाव घेतली आहे.
सचिनच्या स्थानावर म्हणजेच चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराटला पाच कसोटी सामन्यांच्या १० डावांत नाममात्र १३.४०च्या सरासरीने धावा करता आल्या. धावांचे सातत्य टिकवण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील इनडोअर अकादमीत विराटने सचिनच्या उपस्थितीत कसून सराव केला. भारतीय संघात परतण्यासाठी उत्सुक अनुभवी फलंदाज युवराज सिंग यांच्यासह माजी कसोटीपटू आणि प्रशिक्षक लालचंद राजपूतही यावेळी उपस्थित होते.
फलंदाजीतील तांत्रिक दोष दूर करण्यासाठी सचिनची मदत घेणाऱ्या युवा फलंदाजांपैकी विराट पहिला नाही. भारतीय संघाचा भाग असणारे काही फलंदाज वेळोवेळी सचिनचे मार्गदर्शन घेत आहेत. बुधवारी सचिनने इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला मार्गदर्शन केले. याआधी रोहित शर्मा तसेच सुरेश रैनाने सचिनची मदत घेतल्याचे अकादमीतील सूत्रांनी सांगितले.
‘‘सचिनसारख्या महान क्रिकेटपटूकडून मार्गदर्शन हे युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत असते. सचिनकडे अफाट ज्ञान आहे आणि तो त्याचे ज्ञान आणि अनुभव युवा खेळाडूंना देत आहे. त्याच्या उपस्थितीतील सराव युवा खेळाडूंसाठी बहुमूल्य आहे,’’ असे रहाणे आणि रैनाचे वैयक्तिक प्रशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रवीण आमरे यांनी सांगितले.