भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. IPLमध्ये विराटला कर्णधार म्हणून फारसं यश मिळालेलं नसलं तरी भारतीय संघाचं नेतृत्व करताना त्याने अनेकदा यशाची चव चाखली आहे. विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांची जोडी संघातील खेळाडूंकडून मैदानावर अनेक चांगले कारनामे करून घेताना साऱ्यांनी पाहिले आहे. पण रवी शास्त्रींच्या आधी प्रशिक्षक असलेल्या अनिल कुंबळेसोबत मात्र विराटचे मतभेद होते. दोघांनी ते मतभेद उघडपणे मांडले नाहीत, पण अनेकदा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून याबद्दल सुज्ञ चाहत्यांना अंदाज आला. असे असताना आज मात्र विराट कोहलीने केलेल्या एका ट्विटमुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.

विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील नातं कसं आहे हे चाहत्यांनी अनेकदा पाहिलं आहे. अनिल कुंबळे प्रशिक्षकपदी असताना विराट आणि कुंबळे यांच्यात अनेकदा वाद झाल्याचेही सांगण्यात आले होते. तसेच अनिल कुंबळेची प्रशिक्षकपदाची कारकिर्द संपवण्यामागे विराटचाच हात असल्याच्याही चर्चा होत्या. पण याचदरम्यान आज अनिल कुंबळे यांच्या वाढदिवशी विराटने त्यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्यामुळे साऱ्यांचाच भुवया उंचावल्या.

काही फॅन्सने तर या ट्विटनंतर विराटला अकाऊंट हॅक झालं आहे का असे प्रश्नही विचारले. पाहा फॅन्सची मजेदार ट्विट्स…

अनिल कुंबळे यांनी आज ५०व्या वर्षात पदार्पण केले. १९९० साली वयाच्या १९ व्या वर्षी कुंबळे यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली. एका डावात १० बळी टिपणारे कुंबळे हे एकमेव भारतीय गोलंदाज ठरले. कसोटीत ६१९ आणि वन डेमध्ये ३३७ बळी घेत त्यांनी भारतीय फिरकी जागतिक स्तरावर समृद्ध करण्यात हातभार लावला. कुंबळे दोन्ही क्रिकेट प्रकारात सर्वाधिक बळी घेणारे भारतीय गोलंदाज आहेत. २००८ साली त्यांनी क्रिकेटला रामराम ठोकला.