विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या विश्वचषकात दमदार कामगिरी करत आहे. विराट कोहलीनं तीन सामन्यात दोन अर्धशतकं झळकावत समाधानकारक कामगिरी बजावली आहे. पाकिस्तानबरोबरच्या सामन्यात विराट कोहलीनं सर्वाधिक जलद ११ हजार धावा करण्याचा विक्रम केला. यामध्ये त्यानं सचिनचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहली मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही सचिनाचा विक्रम मोडीत काढत असल्याचे दिसतेय. सोशल मीडियावर अॅक्टिव असणाऱ्या विराट कोहलीनं ट्विटरवर फॉलोअर्सच्या बाबतीत सचिनला मागे टाकले आहे.

विराट कोहलीचे ट्विटरवर ३० मिलियन म्हणजेच तीन कोटी फॉलोअर्स झाले आहेत. विराट कोहलीनं ट्विट करत ही माहिती दिली आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला तो भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी हा मान सचिनकडे होता. ट्विटरवर सचिनला २९.६ मिलियन फॉलो करतात.

जगातील फॉलोअर्सचा विचार केल्यास विराट कोहली ५२ व्या क्रमांकावर आहे. तर भारतामध्ये विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे. भारतात ट्विटवर सर्वाधिक फॉलोअर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहेत. ट्विटरवर मोदींना ४८ मिलियन नेटकरी फॉलो करतात. मोदीनंतर अनुक्रमे शाहरूख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि विराट कोहलीचा क्रमांक लागतो.

ट्विटरवर ३० मिलियन फॉलोअर्स झाल्याची माहिती विराटनं ट्विट करून दिली. त्यानं एक व्हिडीओ पोस्ट करत अतिशय मजेदारपणे ही माहिती दिली. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात धोनीने षटकार लगावल्यानंतर विराट कोहलीनं अवाक आणि आश्चर्यचकित झाल्याची प्रतिक्रिया दिली होती. तोच व्हिडीओ विराट कोहलीनं पोस्ट करत ३० मिलियन फॉलोअर्स झाल्याचा विश्वास बसत नसल्याचे म्हटले आहे.

 

दरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहलीचे सध्या पूर्ण लक्ष शनिवारी होणाऱ्या अफगाणिस्तान विरोधातील सामन्यावर आहे. त्यानं आधीच स्पष्ट केले आहे की, अफगाणिस्तान संघाबरोबरही आम्ही पूर्ण क्षमतेनं उतरणार आहोत.