इंग्लंडविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेवर अनेक कारणांनी भारतीय खेळाडू तसेच चाहते नजर ठेवून बसलेले असतील. या मालिकेत सुरेख खेळ केल्यास भारतीय कर्णधार विराट कोहलीला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकते.

चेंडू फेरफारप्रकरणी दोषी आढळल्यामुळे स्मिथ सध्या एक वर्षांची निलंबनाची शिक्षा भोगत आहे. दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या कोहलीपेक्षा स्मिथ २६ गुणांनी पुढे असून या मालिकेत स्मिथवर कुरघोडी करण्यासाठी कोहली नक्कीच उत्सुक असेल. याव्यतिरिक्त भारताचा चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा कर्णधार जो रूट हा कोहलीपेक्षा ४८ गुणाने मागे असून तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

गोलंदाजांमध्ये इंग्लंडचाच जेम्स अँडरसन बऱ्याच काळापासून अव्वल स्थानावर आहे. त्याला भारताच्या रवींद्र जडेजा रविचंद्रन अश्विन यांच्याकडून कडवी चुरस मिळेल. जडेजा व अश्विन हे अनुक्रमे तिसऱ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.

संघाच्या क्रमवारीत भारताचे पहिल्या स्थानावरील वर्चस्व ही मालिका गमावली तरी अबाधित असणार आहे. त्यातच जर भारताने ५-० अशी मालिका जिंकल्यास त्यांचे १२९ गुण होतील व इंग्लंड ९४ गुणांसह सहाव्या क्रमांकावर फेकला जाईल. याउलट, इंग्लंडने ५-० अशा फरकाने मालिका जिंकली, तर ते १०७ गुणांसह थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतील व भारताच्या खात्यातील गुण वजा होऊन ११२ होतील.