विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. शुक्रवारी या सामन्याला सुरुवात होणार आहे. बांगलादेशच्या भारत दौऱ्यात यजमान भारतीय संघाने टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारली. यानंतर कसोटी सामन्यांच्या मालिकेतही भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे. मात्र तरीही कर्णधार विराट कोहलीला एका गोष्टीची चिंता सतावते आहे. ऐतिहासिक कसोटी सामन्याआधी विराटने पत्रकारांशी संवाद साधला.

“भारतामध्ये खेळत असताना सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा असतो ते म्हणजे दव. सामनाधिकाऱ्यांसोबत याबद्दल आम्ही नक्कीच चर्चा करणार आहोत. या गोष्टींचा नेमका अंदाज लावता येत नाही. नेमक्या कोणत्यावेळी दवचा प्रभाव जास्त असेल हे ठामपणे सांगता येत नाही, जशी परिस्थिती असेल तसं खेळत रहावं लागतं.” विराट कोहली पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होता.

याचसोबत इडन गार्डन्सची खेळपट्टी आणि गुलाबी चेंडू हे देखील महत्वाचे मुद्दे ठरणार असल्याचं विराटने स्पष्ट केलं. आम्हाला जे निर्णय घ्यायचे आहेत ते लवकर आणि योग्य घ्यावे लागतील. बॅटची कड घेऊन चेंडू स्लिपमध्ये लवकर येईल, त्यामुळे झेल घेतानाही अधिक सजग रहावं लागणार आहे. आमच्यासाठी हे एका प्रकारचं आव्हान आहे, आणि एक संघ म्हणून आम्ही त्यासाठी तयार आहोत, असंही विराट म्हणाला.