भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली मैदानात दिवसेंदिवस नवनवे विक्रम प्रस्थापित करत असतानाच मैदानाबाहेरील जगात देखील विराटचीच सर्वत्र चर्चा आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेवेळी समाजमाध्यमांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीचेच नाव आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च केलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱया स्थानी आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या कालावधीत नेटकरांनी विराट कोहलीशी संबंधित सर्वाधिक माहिती सर्च, लाईक आणि शेअर केली. यात विराटची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळीची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होती. यासोबत धोनीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर धावचीत बाद केलेल्या थरारक क्षणाची देखील नेटकरांची सर्वाधिक पसंती होती. या दोन क्षणांवर नेटकर भरभरुन व्यक्त झाले.

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सोशल मीडियावर सर्वाधित हिट ठरला. फेसबूकवर तब्बल ८० लाखांहून अधिक जण या सामन्याची चर्चा करत होते, तर या महामुकाबल्याशी निगडीत १० लाखांहून अधिक ट्विट्स केले गेले. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळविलेल्या विजयाच्या दिवशी एकट्या विराट कोहलीवर तब्बल १,६०,००० ट्विट्स केले गेले.