भारतीय संघाचा पहिल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत भारताने पराभव केल्यानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरूद्ध एकदिवसीय सामना खेळला. मात्र विश्वचषक स्पर्धेतील त्याच्या कृत्याबद्दल ICC कडून कोहलीचा गौरव करण्यात आला आहे. कोहलीला 2019 ICC Spirit of Cricket पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवला. त्यात कर्णधार विराट कोहलीच्या एका कृतीने सर्वांचीच मनं जिकली. सामना सुरु असताना भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवली. हा प्रकार कर्णधार विराट कोहलीला आवडला नाही. त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले. इतकंच नव्हे तर त्याने स्मिथसाठी टाळ्या वाजवा असं प्रेक्षकांना सांगितले आणि या प्रकारासाठी प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफीदेखील मागितली.

हा पाहा ‘तो’ व्हिडीओ –

दरम्यान, सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेतही कोहलीला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर कोहली म्हणाला होता की जे घडलंय त्याला (बॉल टॅम्परिंग प्रकरण) खूप कालावधी झाला आहे. आता स्मिथ मैदानात परतला आहे. एखाद्याचे असे खच्चीकरण करणे योग्य नाही. एखाद्या खेळाडूला मैदानात उतरल्यावर वारंवार अशा घटनांचा सामना करावा लागणं चुकीचेच आहे.

“मैदानात भारतीय प्रेक्षकांची संख्या जास्त होती. सामन्यात स्मिथने काहीच चुकीचे केले नव्हते, ज्यासाठी त्याची हुर्यो उडवली पाहिजे. भारतीय प्रेक्षक त्याची हुर्यो उडवत होते, हे पाहून मलाच वाईट वाटले. समजा माझ्या हातून स्मिथसारखी चूक झाली असती आणि ती मान्य करुन मैदानात परतलो असतो आणि तरी देखील माझी हुर्यो उडवली असती तर मला देखील ते आवडले नसते. म्हणूनच मी प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफी मागितली”, असे कोहलीने सांगितले होते.