न्यूझीलंडचा यष्टीरक्षक बी.जे.वाटलिंग आज आपल्या क्रिकेट कारकीर्दीच्या शेवटच्या दिवशी खेळत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा वॉटलिंगच्या कारकिर्दीचा अंतिम सामना आहे. राखीव दिवसाचा खेळ सुरू होताच भारताचा कर्णधार विराट कोहलीने मैदानात त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आयसीसीने या दोघांचा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओला अनेक लोकांनी पसंती दर्शवली आहे.

आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराट वॉटलिंगचे अभिनंदन करताना दिसत आहेत. न्यूझीलंडचा सर्वोत्तम कसोटी यष्टीरक्षक म्हणून वॉटलिंग ओळखला जातो. सामन्यातील पहिल्या डावात वॉटलिंगला मोठी खेळी करण्याची सुवर्णसंधी होती, पण शमीने टाकलेला चेंडू त्याची दांडी घेऊन गेला. त्याला फक्त एक धाव करता आली.

 

हेही वाचा – ‘‘लवकरच तू सलमान खान होशील”, वर्कआउटचा व्हिडिओ पाहून इंग्लिश क्रिकेटरनं केलं चहलला ट्रोल

वॉटलिंगच्या नावावर कसोटी सामन्यात यष्टीरक्षक म्हणून २५७ बळी आहेत. ३५ वर्षीय वॉटलिंगने कसोटीत ८ शतके ठोकली असून २०५ ही त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटी क्रिकेटमधील सहाव्या विकेटसाठी पाच सर्वोत्कृष्ट भागीदारींपैकी दोन तन्यूझीलंडकडून असून त्या दोघांमध्ये वॉटलिंगचा समावेश आहे.

वॉटलिंगच्या नावावर ८ स्टंपिंगही आहेत. २०१९मध्ये ओव्हलमध्ये इंग्लंडविरुद्ध वॉटलिंगने दुहेरी शतक ठोकले होते. या सामन्यात न्यूझीलंडच्या विजयात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वॉटलिंगने न्यूझीलंडकडून पाच टी-२० आणि २८ एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.