भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. विंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात विराटने शतकी खेळी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र सामना संपल्यानंतर बोलताना विराटने केलेल्या वक्तव्यामुळे अनेक चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. ”क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी माझ्याकडे आता काही वर्ष शिल्लक आहेत. देशासाठी खेळणं ही सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा खेळ गंभीरपणे न घेणं तुम्हाला परवडू शकत नाही. तुम्ही भारतासाठी खेळताय आणि ही संधी सगळ्यांना मिळत नाही”, अशा भावना विराटने व्यक्त केल्या होत्या.

विराटच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी अनेक तर्क-वितर्क बांधले होते. मात्र विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी विराट इतक्या लवकर निवृत्त होणार नाही असं म्हटलंय. “विराट पुढची 10 वर्ष तरी निवृत्ती स्विकारणार नाही. जोपर्यंत विराट चाळीशीत प्रवेश करत नाही तोपर्यंत तो आपल्या खेळाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहिल. प्रत्येक सामन्यादरम्यान त्याची धावांची भूक वाढते आहे व सध्या तो चांगलाच फिट आहे, त्यामुळे विराट इतक्या लवकर निवृत्ती स्विकारणार नाही.” राजकुमार शर्मा यांनी आपलं मत मांडलं.

2018 मध्ये विराटला दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावे लागले होते. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे विराटला कौंटी क्रिकेटमधून माघार घ्यावी लागली होती. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याच्या दुखापतीने डोकं वर केलं होतं. त्यानंतर आशिया चषक स्पर्धेत त्याला विश्रांती देण्यात आली होती.

अवश्य वाचा – तू माणूस आहेस की कोण, तमिम इक्बालकडून विराट कोहलीची स्तुती