भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिका

तब्बल दोन महिन्यांच्या प्रदीर्घ क्रिकेट दौऱ्याची सुरुवात धडाक्यात करण्यासाठी कर्णधार विराट कोहली व त्याची युवा सेना सज्ज झाली आहे. त्यामुळे बुधवारपासून ब्रिस्बेनच्या वेगवान गोलंदाजांना पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर सुरू होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात विजयाची बोहनी करून ऑस्ट्रेलियाला धक्का देण्याचे भारताचे लक्ष्य असणार आहे.

भारताच्या अंतिम १२ खेळाडूंची घोषणा करण्यात आली असून, यात कृणाल पंडय़ाला संघात स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतून माघार घेणारा कोहली संघात परतला असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची बॅट नेहमीच तळपते. त्याशिवाय उपकर्णधार रोहित शर्मादेखील मागील काही महिन्यांपासून भन्नाट फॉर्मात असून ट्वेन्टी-२० कारकीर्दीतील पाचवे शतक झळकावण्यासाठी तो उत्सुक आहे. मधल्या फळीत लोकेश राहुल व दिनेश कार्तिक यांच्याकडून भारताला चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा व भुवनेश्वर कुमार यांच्यावर भारताची मदार असून त्यांना कुलदीप यादव किंवा युजवेंद्र चहल यांच्यापैकी एका फिरकीपटूची साथ मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे चेंडू फेरफारप्रकरणी दोषी आढळल्यामुळे एक वर्षांच्या निलंबनाची शिक्षा भोगणारे स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर या दोघांसारखे हुकमाचे एक्के संघात नसल्यामुळे कांगारूंची अवस्था बिकट झाली आहे. त्याशिवाय प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्क व जोश हॅझलवूड यांनादेखील या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आल्यामुळे यजमानांसाठी आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय खेळाडूंचा मुकाबला करणे कठीणच जाईल. आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळताना ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानाचा फायदा उठवण्याची संधी असून यामध्ये ते कितपत यशस्वी होतात, हे पाहणे रंजक ठरेल.

धोनीच्या अनुपस्थितीत पंतवर नजरा

युवा ऋषभ पंत या मालिकेत कशी कामगिरी करतो, याकडे संपूर्ण विश्वाचे लक्ष लागून आहे. अनुभवी खेळाडू महेंद्रसिंह धोनीला या मालिकेसाठी वगळण्यात आल्यामुळे पंतवर अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याबरोबरच यष्टिरक्षणाची जबाबदारीही येऊ शकते.

४ जसप्रीत बुमराला ट्वेन्टी-२० कारकीर्दीत ५० बळींचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या चार बळींची आवश्यकता आहे. त्याने हा आकडा गाठल्यास अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरेल.

६४ रोहित शर्माला (२२०७ धावा) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी आणखी ६४ धावांची आवश्यकता आहे. न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल २२७१ धावांसह या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

संघ

भारत (अंतिम १२) : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), कृणाल पंडय़ा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद.

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), अ‍ॅश्टन अगर, जेसन बेहरेनडॉर्फ, अ‍ॅलेक्स करे, नॅथन कुल्टर-नाईल, ख्रिस लीन, बेन मॅकडरमॉट, ग्लेन मॅक्सवेल, डार्सी शॉर्ट, बिली स्टॅनलेक, मार्कस स्टोइनिस, अँड्रय़ू टाय, अ‍ॅडम झम्पा.

* सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून

* थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सोनी टेन ३