स्टिव्ह स्मिथचं आक्रमक शतक आणि इतर फलंदाजांनी त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. सिडनीच्या मैदानावर दुसऱ्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३८९ धावांचा डोंगर उभा केला. स्टिव्ह स्मिथने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत १०४ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार फिंच, डेव्हिड वॉर्नर, लाबुशेन, मॅक्सवेल यांनीही उत्तम साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यातही निराशाजनक कामगिरी केली. भारताकडून शमी, बुमराह आणि पांड्याने १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाच्या सलामीवीरांनीही आश्वासक सुरुवात केली. परंतू अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर शिखर धवन आणि मयांक अग्रवाल दोघेही माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने संघाचा डाव सावरला. श्रेयससोबत महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत विराटने आपलं अर्धशतकही झळकावलं. यादरम्यान विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. या निमित्ताने विराटला सचिन आणि रोहित शर्मा यांच्या पंगतीत मानाचं स्थान मिळणार आहे.

विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांची भागीदारी हेन्रिकेजने तोडली. स्टिव्ह स्मिथने सुरेथ झेल पकडत श्रेयस अय्यरला माघारी धाडलं. अय्यरने ३८ धावांची खेळी केली.