खलील अहमदची भेदक गोलंदाजी आणि वॉश्गिंटन सुंदर तसेच विराट सिंग यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारतीय १९ वर्षांखालील संघाने तिरंगी एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेच्या संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाला २२१ धावांचीच मजल मारता आली. कवीन बंदाराने ७४ तर कमिंदू मेंडिसने ६५ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारतातर्फे खलील अहमदने ५५ धावांत ४ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना वॉश्गिंटन सुंदर आणि विराट सिंग यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हे लक्ष्य गाठले. सुंदरने ६१ तर विराटने ६० धावांची खेळी केली. महीपाल लोमरोरने ३२ धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

 
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका १९ वर्षांखालील संघ : ५० षटकांत ९ बाद २२१ (कवीन बंदारा ७४, कमिंदू मेंडिस ६५, खलील अहमद ४/५५) पराभूत विरुद्ध भारतीय १९ वर्षांखालील संघ : ४७.५ षटकांत ६ बाद २२३ (वॉश्गिंटन सुंदर ६१, विराट सिंग ६०, लहिरु कुमारा २/३३)