सलामीवीर मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने अखेरच्या वन-डे सामन्यात बाजी मारली. भारताने विजयासाठी दिेलेलं २९७ धावांचं आव्हान न्यूझीलंडने ५ गडी राखत पूर्ण केलं. या विजयासह न्यूझीलंडने वन-डे मालिकेत भारताला व्हाईटवॉश दिला आणि टी-२० मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी २० आणि एकदिवसीय मालिका संपली. त्यानंतर आता दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. २१ फेब्रुवारीपासून ही कसोटी मालिका सुरू होईल. या मालिकेसाठी दोनही संघ कसून तयारी करत आहेत. तसेच फावल्या वेळेत काही क्षण एन्जॉयदेखील करत आहेत. त्याच क्षणांपैकी एका क्षणाचा फोटो विराट कोहलीने दोन दिवसांपूर्वी पोस्ट केला होता. क्रिकेटच्या सरावानंतर मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत भारताचा कर्णधार विराट कोहली याने सोशल मीडियावर मोहम्मद शमी आणि पृथ्वी शॉ यांच्या सोबतचा फोटो शेअर केला. चित्रविचित्र हाव-भाव केलेला फोटो त्याने पोस्ट केला होता.

विराटने तो फोटो पोस्ट करताच सोशल मीडियावर त्याचे मीम्सदेखील तयार झाले. त्यातच नागपूर पोलिसांनीदेखील या फोटोचा वापर करत एक इशारा दिला आहे. तुम्ही स्कल ब्रेकर चॅलेंज खेळलात तर तुमची अशी अवस्था होईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

काय आहे स्कल ब्रेकर चॅलेंज

सध्या स्कल ब्रेकर चॅलेंज चांगलाच गाजत आहे. यात ३ मुलांपैकी २ मुले बाजूला उभी राहतात. मध्ये उभा असणारा मुलगा उंच उडी मारतो. त्या मुलाचे पाय जमिनीवर पोहोचण्याआधीच बाजूची दोन मुले त्याला पाठीवर जोरात खाली पाडतात.