भारताचे माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ यांनी आगामी काळात विराट कोहली सचिन तेंडुलकरांचा १०० शतकांचा विक्रम मोडेल असं भाकीत केलं आहे. सध्या विराट कोहली चांगल्याच फॉर्मात असून नुकतचं आफ्रिकेविरुद्ध सामन्यात विराटने वन-डे कारकिर्दीतलं आपलं ३५ वं शतक झळकावलं. कसोटीत विराट कोहलीच्या नावावर २१ शतकं जमा आहेत. त्यामुळे विराटच्या नावावर सध्या ५६ शतकांची नोंद आहे. त्यामुळे सध्याचा फॉर्म लक्षात घेता विराट सचिनचा विक्रम नक्की मोडेल असा विश्वास विश्वनाथ यांनी व्यक्त केला आहे.

“विराट आपल्या कामगिरीत सातत्य राखतोय, आणि प्रत्येक सामन्यागणिक तो शतकं ठोकत चाललाय. त्यामुळे सचिनचा विक्रम मोडण्याची विराट कोहलीकडे पुरेपूर संधी उपलब्ध आहे. क्रिकेटमध्ये विक्रम हे मोडण्यासाठीच बनवले जातात, त्यामुळे आपला विक्रम विराटसारख्या गुणी खेळाडूने मोडला हे पाहून सचिनलाही आनंद होईल.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गुंडप्पा विश्वनाथ बोलत होते.

विराट आपल्या सहकाऱ्यांना मैदानात चांगला पाठींबा देतोय. त्याच्या या पाठींब्याचे परिणाम भारतीय संघाच्या कामगिरीत पहायला मिळतायत. त्यामुळे कोहली सध्या कसा खेळ करतोय हे सर्व जण पाहतायत. आगामी काळात विराट अशीच कामगिरी करेल अशीही आशा विश्वनाथ यांनी व्यक्त केली आहे. विराटची कोणत्याही खेळाडूशी किंवा कर्णधाराशी तुलना करणं मला आवडणार नाही. विराट त्याच्या कुवतीप्रमाणे खेळ करतोय, आणि आफ्रिकेत त्याने केलेली कामगिरी ही नक्कीच प्रशंसनीय आहे. त्याची इतर खेळाडूंसोबत तुलना करणं योग्य ठरणार नाही, असंही विश्वनाथ म्हणाले.