भारतीय कर्णधार विराट कोहली हा यंदाच्या काऊंटी क्रिकेट स्पर्धेत सरे या संघाकडून खेळणार होता. मात्र स्लिप डिस्कचा आजार झाल्यामुळे आता तो काऊंटी क्रिकेट खेळणार नाहीये. मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे या स्पर्धेनंतर भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार होता. या संघाचे नेतृत्व कोहली करणार होता. परंतु त्याच्या दुखापतीमुळे कोहलीच्या या दौऱ्यातील सहभागावर प्रशचिन्ह उपस्थित झाले आहे. १५ जूननंतर विराटची तंदुरुस्ती चाचणी म्हणजेच फिटनेस टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या इंग्लंड दौऱ्यातील सहभागावर बीसीसीआय निर्णय घेणार आहे.

डॉक्टरांनी विराटला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र विराटवर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचं वृत्त मात्र डॉक्टरांनी फेटाळून लावले आहे. रिपोर्टनुसार, विराटने डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर काऊंटी क्लब सरेला खेळणार नसल्याचं कळवलं आहे. आणि बीसीसीआयनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मेडिकल रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीला काऊंटी खेळण्याची संधी गमवावी लागणार आहे. गेल्या १२ महिन्यांपासून सलग क्रिकेट खेळत असलेल्या विराट कोहलीने स्लिप डिस्कसंबंधी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी खारमधील एका रुग्णालयला भेट दिली. तेथील तज्ञ डॉक्टरांनी विराटची तपासणी केली. एका वृत्तानुसार, मेडिकल रिपोर्टमध्ये विराटच्या मणक्याला दुखापत झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे.