01 March 2021

News Flash

विराट तडाखा!

चॅम्पियन्स करंडकावर फक्त आपलेच नाव कोरले जाणार, या आशेच्या किरणांनी भारतीयांचा दिवस उगवला खरा, पण पावसाच्या ‘खो-खो’पुढे कुणाचे काहीच चालले नाही. क्रिकेट पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या

चॅम्पियन्स करंडकावर फक्त आपलेच नाव कोरले जाणार, या आशेच्या किरणांनी भारतीयांचा दिवस उगवला खरा, पण पावसाच्या ‘खो-खो’पुढे कुणाचे काहीच चालले नाही. क्रिकेट पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या दर्दी चाहत्यांना पावसाचा पाठशिवणीचाच खेळ पाहावा लागला आणि हा ‘खेळखंडोबा’ थांबवण्यासाठी चाहते वरुणराजाला साकडे घालत होते. अखेर चाहत्यांची याचना ऐकत वरुणराजाने ‘तथास्तु’ म्हटले आणि ट्वेन्टी-२० षटकांचा सामना खेळवण्यात आला. यावेळी गोलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्या खेळींच्या जोरावर इंग्लंडपुढे १३० धावांचे आव्हान ठेवता आले.
तत्पूर्वी, नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार आमनेसामने उभे ठाकले आणि इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले तोपर्यंत सारे आलबेल होते, पण त्यानंतर पावसाने आपला खेळ सुरू करत साऱ्यांच्याच आनंदावर विरजण पाडले. ठराविक कालांतराने मैदानाची पाहणी करण्यात येत होती. पाऊस बराच वेळ बरसून थोडीशी उसंत घ्यायचा, तेव्हा पुन्हा एकदा सामना होण्याची आशा जिवंत व्हायची. पण अखेर साडेपाच तासांच्या प्रतिक्षेनंतर सामना प्रत्येकी २० षटकांमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
वातावरण आणि खेळपट्टी गोलंदाजीला पोषक असल्याने रोहित शर्मा (९) आणि शिखर धवन (३१) या दोघांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, पण रोहितला बाद करत स्टुअर्ट ब्रॉडने भारताला पहिला धक्का दिला. रोहित बाद झाल्यावर धवनने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. सातव्या षटकात याच ब्रॉडला षटकार खेचत धवनने आपले इरादे स्पष्ट केले खरे, पण त्यानंतरच्याच षटकात पुन्हा एकदा पावसाने डोके वर काढल्याने सामना थांबवावा लागला. सामन्याला सुरुवात झाली तेव्हा भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर भारताने अर्धशतक साजरे केले आणि दुसऱ्या चेंडूवर धवनचा बळी गमावला. त्यानंतर १ बाद ५०वरून भारताची ५ बाद ६६ अशी अवस्था झाली आणि इंग्लंडचा संघ वरचढ होऊ पाहत होता. पण यावेळी कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी भारताच्या डावाला चांगला आकार देत संघाला शतकी मजल मारून दिली. जेम्स अँडरसनला मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली बाद झाला आणि सर्व जबाबदारी जडेजाच्या खांद्यावर आली. कोहलीने बाद होण्यापूर्वी चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३४ चेंडूंत ४३ धावांची खेळी साकारली. अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी केल्यामुळे भारताला १२९ धावा करता आल्या. जडेजाने यावेळी २ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ३३ धावांची खेळी साकारली.
धावफलक
भारत : रोहित शर्मा त्रिफळा गो. ब्रॉड ९, शिखर धवन झे. ट्रेडवेल गो. बोपारा ३१, विराट कोहली झे. बोपारा गो. अँडरसन ४३ , दिनेश कार्तिक झे. मॉर्गन गो. ट्रेडवेल ६, सुरेश रैना झे. कुक गो. बोपारा १, महेंद्रसिंग धोनी झे. ट्रेडवेल गो. बोपारा ०, रवींद्र जडेजा नाबाद ३३, रविचंद्रन अश्विन धावचीत गो. बेल १, भुवनेश्वर कुमार नाबाद १, अवांतर ४, एकूण २० षटकांत ७ बाद १२९
बाद क्रम : १-१९, २-५०, ३-६४, ४-६६, ५-६६, ६-११३, ७-११९.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन ४-०-२४-१, स्टुअर्ट ब्रॉड ४-०-२६-१, टीम ब्रेसनन ४-०-३४-०, जेम्स ट्रेडवेल ४-०-२५-१, रवी बोपारा
४-१-२०-३                                                    (धावफलक अपूर्ण)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 7:14 am

Web Title: virats stormy hit
Next Stories
1 स्पेन, उरुग्वे उपांत्य फेरीत
2 चॅम्पियन्स करंडक विजयी भारतीय संघावर बीसीसीआयची अर्थवृष्टी
3 नायजेरियाला चमत्काराची अपेक्षा!
Just Now!
X