भारताचा ऑलिम्पिकपटू वीरधवल खाडेने सिंगापूर खुल्या आंतरराष्ट्रीय वयोगट जलतरण स्पर्धेत सोनेरी वेध घेतला. त्याने ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात हे यश संपादन केले.

कोल्हापूरच्या २६ वर्षीय खाडेने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या आव्हानास सामोरे जात हे अंतर २३.०२ सेकंदांत पार केले. सुरुवातीपासून वेगवान कौशल्य दाखवत त्याने अन्य खेळाडूंना मागे टाकले.

‘‘देशाकरिता पदक जिंकणे ही नेहमीच अभिमानास्पद कामगिरी असते. खरंतर मला यापेक्षा कमी वेळ अपेक्षित होती. अर्थात मला येथील स्पर्धेद्वारे भरपूर शिकायला मिळाले आहे. आगामी काळात या कामगिरीत मी निश्चितच सुधारणा करीन,’’

असे शर्यत संपल्यानंतर खाडेने सांगितले.

आगामी राष्ट्रकुल स्पर्धेबाबत तो म्हणाला, ‘‘या स्पर्धेत चांगले यश मिळवण्याची मला खात्री आहे. त्याकरिता गेले पाच महिने मी बेंगळूरु येथे कसून सराव करीत आहे व येथील सुवर्णपदक हे त्यासाठी प्रेरणादायकच आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आदी खेळाडूंबरोबर लढत द्यावी लागणार आहे. परंतु त्याचीही मी मानसिक तयारी केली आहे. कमीतकमी वेळ कशी नोंदवता येईल या दृष्टीने मी नियोजन केले आहे. त्याकरिता पूरक व्यायामही सुरू आहे.’’