कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूचा खरा कस लागतो. त्यामुळे कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. कसोटी क्रिकेटला प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी दिवस-रात्र कसोटी सामन्यांचा प्रयोग करण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, पण आता क्रिकेटची सर्वोच्च परिषद असलेली ICC कसोटी क्रिकेट सामन्यांचा कालावधी कमी करण्याचा विचार करत आहे.
“BCCI, जरा लाज वाटू द्या”; संजू सॅमसनला वगळल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संताप
कसोटी सामना म्हणजे पाच दिवस हे समीकरण आहे. पण प्रत्येक वर्षातील प्रचंड गजबजलेले क्रिकेट दौरे लक्षात घेता ICC कसोटी क्रिकेट सामन्याचे स्वरूप बदलून ते ४ दिवसांचे करण्याचा विचार करत आहे. याबाबत क्रिकेट वर्तुळातून टीकेचा सूर उमटत आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटपटू यास विरोध करत आहेत. यात आता भारतीय कसोटी त्रिशतकवीर विरेंद्र सेहवाग याची भर पडली आहे. विरेंद्र सेहवागने कसोटीची तुलना डायपरशी करत ICC च्या प्रस्तावाला विरोध केला आहे.
CSK चा खेळाडू संघात परतला; ‘या’ देशाविरूद्ध खेळणार टी २० मालिका
डायपरशी केली कसोटी क्रिकेटची तुलना
ICC च्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांनी चार दिवसीय कसोटी क्रिकेटवर चर्चा होणारच असे म्हटले आहे. त्यानंतरही या प्रस्तावाला विरोध सुरू आहे. “मी क्रिकेटमधील बदलाला नेहमी पाठिंबा दर्शवला आहे. भारताच्या पहिल्यावहिल्या टी २० सामन्यात संघाचे नेतृत्व माझ्याकडे होते याचा मला आजही अभिमान वाटतो. २००७ च्या टी २० विश्वविजेत्या संघाचाही मी भाग होतो. पण ५ दिवसाचे कसोटी क्रिकेट हा एक रोमॅन्टिक अनुभव आहे. कसोटी क्रिकेटमधील काही बदल हे चांगले होते. कसोटी क्रिकेटच्या जर्सीवर खेळाडूंची नावे असणे, गुलाबी चेंडूने क्रिकेट खेळणे इतपर्यंत सगळं ठिक आहे. पण बाळाचे डायपर्स आणि पाच दिवसीय क्रिकेट यांची उपयुक्तता जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत त्यात बदल घडवू नये, अशा शब्दात विरेंद्र सेहवागने ICC च्या चार दिवसीय क्रिकेटच्या प्रस्तावाला विरोध केला.
“पाच दिवसीय कसोटी क्रिकेट अजूनही जिवंत आहे. कसोटी क्रिकेट हे १४३ वर्षांचं एक तरूण आणि तंदुरूस्त व्यक्तिमत्व आहे. त्याला स्वत:चा आत्मा आहे. चार दिवसाचं केवळ चांदणं असतं.. कसोटी क्रिकेट नव्हे!” असंही सेहवागने ICC ला सुनावलं.
काय आहे प्रस्ताव?
कसोटी सामना चार दिवसांचा करण्याच्या नियमाची अंमलबजावणी २०२३ पासून होण्याची शक्यता आहे. २०२३ ते २०३१ या कालावधीत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी हा नियम राबवला जाण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याबाबत विचारविनिमय सुरु असून तज्ज्ञांकडून मतं मागवली जात आहेत.
कोण-कोण विरोधात?
ICC चार दिवसाचा कसोटी सामना करण्याचा प्रस्ताव चर्चेला आणणार आहे. सध्या क्रिकेटमधील जुने-जाणते तज्ञ्ज तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंकेतील माजी फिरकीपटू या कल्पनेच्या विरोधात आहेत. तसेच सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, संदीप पाटील इत्यादी दिग्गज खेळाडूंनीही या प्रस्तावावर नाराजी दर्शवली आहे. याशिवाय विराट कोहलीनेही या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2020 11:38 am