आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अलीकडेच निवृत्ती जाहीर केलेला भारतीच संघाचा विस्फोटक सलामीवर वीरेंद्र सेहवागने आपल्या घरच्या मैदानात म्हणजेच दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियमवरील निरोपाच्या भाषणात कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव न घेतल्याने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भारत वि. द.आफ्रिकेदरम्यानची चौथी कसोटी कोटला स्टेडियमवर सुरू आहे. हा सामना सुरू होण्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) वीरेंद्र सेहवागचा सन्मान केला. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी सन्मानचिन्ह देऊन सेहवागचा सत्कार केला.
सन्मानसोहळ्यानंतर आभार व्यक्त करताना सेहवागचे भाषण झाले. सेहवागने आपल्या भाषणात दिल्ली क्रिकेट असोसिएशन, पहिले प्रशिक्षक ए.एन.शर्मा आणि दिल्लीच्या १९ वर्षाखालील संघात त्याची निवड करणारे सतीश शर्मा यांना धन्यवाद दिले. यानंतर आपल्या कारकिर्दीतील भारताच्या सर्व कर्णधारांचा देखील सेहवागने उल्लेख केला. क्रिकेटमधील आपला पहिला कर्णधार अजय जडेजापासून सुरू करत, वीरूने सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, सचिन तेंडुलकर या सर्व कर्णधारांचे आभार मानले. पण, या नामावलीत महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख त्याने केला नाही. सेहवाग आपली शेवटची बरीच वर्षे धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळला आहे. तरीसुद्धा कर्णधारांच्या यादीत त्याने धोनीचे नाव न घेतल्याने क्रिकेट वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे.तो धोनीचं नाव घ्यायला विसरला की त्याने नाव घेणं मुद्दाम टाळलं, याबद्दलच्या चर्चांना उधाणं आलं आहे.

दरम्यान, सेहवागच्या या सन्मान सोहळ्याला त्याचे कुटुंबिय देखील उपस्थित होते.  सेहवागच्या दोन सर्वोत्तम खेळींचा गौरव म्हणून या कसोटीसाठी कोटला स्टेडियमच्या दोन एण्ड्सचं वीरू ३०९ आणि वीरू ३१९ असं नामकरणही करण्यात आलं आहे.

 

Virendra-Sehwag_31-600x400