आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यात नवीन विक्रम होत असतात. टी-२० क्रिकेटच्या आगमनानंतर तर प्रत्येक सामन्यात कोणते विक्रम मोडले जातील याकडे चाहत्यांचं लक्ष असतं. भारतीय क्रिकेट संघात आतापर्यंत अनेक खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी करत विक्रम रचले आहेत. विरेंद्र सेहवाग हा त्यापैकीच एक खेळाडू…भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जायचा. कसोटी क्रिकेट असो, वन-डे क्रिकेट किंवा टी-२० विरुने कधीही कोणत्याही गोलंदाजाची भीती बाळगली नाही. प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करत सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दरारा निर्माण केला होता. कसोटीत दोन त्रिशतकं, वन-डे क्रिकेटमध्ये द्विशतक असे अनेक विक्रम सेहवागच्या नावावर जमा आहेत.

यातीलच एक विक्रम म्हणजे एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा अधिक चौकार मारणारा सेहवाग हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. सेहवागने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३ सामने खेळताना ५२.३३ च्या सरासरीने २३५५ धावा केल्या होत्या. या वेळी त्याने ४४ षटकार तर तब्बल ३०२ चौकार मारले होते. ३०२ चौकारांमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक चौकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला होता. आजही त्याचा हा विक्रम अबाधित आहे. याच वर्षात सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नई कसोटीत ३१९ धावांची खेळी केली होती, ज्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून दोन त्रिशतकं झळकावणारा सेहवाग एकमेव क्रिकेटपटू ठरला होता.

जाणून घेऊयात सेहवाग व्यतिरीक्त अन्य कोणत्या देशाच्या फलंदाजांना अशी कामगिरी जमली आहे –

  • तिलत्करने दिलशान (२००९) श्रीलंका – ३१८ चौकार
  • केन विल्यमसन (२०१५) न्यूझीलंड – ३०९ चौकार
  • कुमार संगकारा (२००६) श्रीलंका – ३०७ चौकार
  •  विरेंद्र सेहवाग (२००८) भारत – ३०२ चौकार
  • कुमार संगकारा (२०१४) श्रीलंका – ३०१ चौकार
  • रिकी पाँटींग (२००५) ऑस्ट्रेलिया – ३०० चौकार