सलामीवीर शिखर धवन याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात ५० षटकात ७ बाद २८५ धावांपर्यंत मजल मारली. धवनने १२० चेंडूत १२७ धावा करत १५ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. या शतकबरोबर त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील १४वे शतक ठोकले. धवनने १२० चेंडूंत १५ चौकार आणि २ षटकार खेचून १२७ धावा चोपल्या.

शिखरने युवराज सिंगच्या १४ शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये धवन सहाव्या स्थानी विराजमान झाला आहे. मात्र त्याच्या आजच्या शतकाने भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याला चिंतेत टाकल्याची शक्यता नाकारता येत नाही. धवनला आता सेहवागचाएकदिवसीय कारकिर्दीतील शतकांचा विक्रम मोडण्यासाठी केवळ २ शतकांची गरज आहे. सेहवागने एकूण १५ शतके ठोकली आहेत.

दरम्यान, या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह अव्वल आहे. त्या पाठोपाठ विराट कोहली ३५ शतकासह दुसऱ्या तर माजी कर्णधार सौरव गांगुली २२ शतकासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणारा कर्णधार रोहित शर्मा १८ शतकांसह चौथा आहे.