पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ११ धावांनी परभाव करत भारतीय संघानं विजयी सुरुवात केली आहे. मालिकेत आघाडी घेतली असती तरी माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागनं भारतीय संघ निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.

सोनी स्पोर्ट्ससोबत बोलताना विराट कोहलीवर नाराजी व्यक्त केली. पहिल्या टी-२० सामन्यात संघ निवड करताना श्रेयस अय्यर आणि चहलला का वगळण्यात आलं? असा प्रश्न सेहवागनं उपस्थित केला. सेहवागनं संघ निवडीवर प्रश्न उपस्थित करत असतानाच विराटच्या कामगिरीवरही नाराजी व्यक्त केली आहे. संघात स्थान मिळवण्याचा नेमका निकष काय आहे? गेल्या काही टी-२० सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला संघाबाहेर केलं जातंय. विराट कोहली वगळता इतर सर्वांना नियम लागू आहेत का? कोहलीबाबत कोणतेच नियम लागू का होत नाहीत? त्याच्या फलंदाजी क्रमवारीत कधीच बदल होत नाही आणि त्याच्याकडून चांगली कामगिरी होत नसेल तर त्याला संघाबाहेरही बसवलं जात नाही, असा राग सेहवागने यावेळी व्यक्त केला.

सेहवाग म्हणाला की, २०१९ विश्वचषकापासून अय्यरनं भारतासाठी टी-२० आणि एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. चौथ्या क्रमांकावर अय्यर तुमचा विश्वासू खेळाडू झाला आहे. असे असतानाही कोणत्या निकषानुसार पहिल्या सामन्यातून त्याला वगळण्यात आलं?

मनीष पांडेला दुसरी संधी?

फिरकीपटू अ‍ॅडम झम्पाच्या गोलंदाजीसमोर मनीष पांडे चाचपडताना दिसला. सुरुवातीचे काही चेंडू निर्धाव घेतल्यामुळे भारताच्या धावगतीला वेसण बसली. त्यामुळे आक्रमक फलंदाजी करणाऱ्या पांडेला दुसऱ्या सामन्यात संधी मिळणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पांडे आणि श्रेयस अय्यर हे एकाच धाटणीचे फलंदाज असल्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजावर हल्ला चढवण्याआधी ते काही चेंडू खेळून काढतात. संजू सॅमसन आणि हार्दिक पंडय़ा यांनी आपापली कामगिरी चोखपणे निभावली असली तरी त्यांच्याकडून मोठय़ा फटकेबाजीची आशा आहे.