सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनी यांची गणना भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. या दोघांनी भारतीय संघाला आंततराष्ट्रीय स्तरावर नवी ओखळ मिळवून दिली. दोघांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक टप्पे गाठले. गांगुलीने भारतीयसंघामध्ये आत्मविश्वास निर्माण केला की ते परदेशात जिंकू शकतात. त्याचबरोबर धोनीने भारताला पुन्हा विश्वविजेता बनवण्याचा प्रयत्न केला. भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग या दोघांच्या कर्णधारपदाखाली खेळला आहे. या दोघांमध्ये भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार कोण आहे हे सेहवागने सांगितले.

आरजे रौनकच्या यूट्यूब शोमध्ये सेहवागने याबाबत माहिती दिली. “ते दोघेही चांगले कर्णधार होते पण मला वाटते की सौरव गांगुली सर्वोत्तम होता. कारण गांगुलीने एक टीम बनवली, जिथे त्याने नवीन आणि आशादायक खेळाडूंची निवड केली आणि संघाची पुनर्बांधणी केली. त्यांनी भारताला परदेशात जिंकणे शिकवले. आम्ही कसोटी मालिका ड्रॉ केली, कसोटी सामने जिंकणे शिकलो,” असे सेहवागने सांगितले. गांगुलीच्या नेतृत्वाखाली सेहवाग कसोटीत सलामीचा फलंदाज म्हणून भरभराटीला आला. त्याचबरोबर धोनीच्या नेतृत्वाखाली तो दोन वेळा विश्वविजेता संघाचा सदस्य होता.

गांगुलीने एक तरुण आणि प्रतिभावान भारतीय संघाला एकत्र केले, ज्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये नवीन युगाची सुरुवात केली. धोनीने चांगले काम केले आणि संघाला पुढे नेले असे सेहवागने सांगितले. धोनीच्या कर्णधारपदावर तो म्हणाला की, “धोनीला विकसित झालेल्या संघाचा फायदा झाला. त्यामुळे जेव्हा तो कर्णधार झाला तेव्हा त्याला नवीन संघ तयार करणे फारसे कठीण नव्हते. त्यामुळे दोघेही चांगले होते पण माझ्या मते गांगुली सर्वोत्तम कर्णधार होता.”